
राहुल गांधी यांना भाषणे लिहून देणारे सध्याचे कॉंग्रेस पक्षाच्या प्रचार यंत्रणेचे प्रमुख आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी निवडणुकीतल्या जय-पराजयाविषयी काही विश्लेषण केले आहे. नरेंद्र मोदी पराभूत झाल्यास काय होईल आणि राहुल गांधी पराभूत झाल्यास काय होईल, अशी ती मांडणी आहे. पण ही मांडणी करताना त्यांनी कोठे तरी राहुल गांधी पराभृूत होऊ शकतात हे गृहित धरलेले आहे आणि ही गोष्ट ङ्गारच सूचक आहे. कारण कॉंग्रेसला राहुल गांधींच्या पराभवाची चाहूल लागल्याचे ते लक्षण आहे. सध्याची कॉंग्रेसची परिस्थिती पाहिल्यास अशा प्रकारच्या पराभवाची शक्यता जयराम रमेश यांना वाटावी हेही साहजिक आहे. कारण काल त्याची एक चुणूक दिसली आहे. राहुल गांधी यांच्या सभेत जम्मू काश्मीरमधील एका सरपंचाने गोंधळ घातला. राहुल गांधी यांच्या सभांना खूप मोठा पोलीस बंदोबस्त असतो. त्यांच्या सभेचे व्यासपीठ श्रोत्यांपासून बरेच दूर असते. कोणी त्यांना प्रश्न विचारू नयेत आणि राहुल गांधी यांची उत्तर देण्याच्या क्षमतेची झाकली मूठ सव्वा लाखाची वाटावी म्हणून हा सारा खटाटोप जारी असतो. पण काल त्यांच्या सभेत गोंधळ घालणार्या सरपंचाने त्यांना आपला आवाज ऐकायला जावा यासाठी आपल्या गळ्यात एक ध्वनिवर्धक लपेटून आणला होता आणि त्याने त्यावर बोलून सभेत अडथळा आणला.
असा प्रकार घडल्यास राहुल गांधी यांचा आब कमी होईल म्हणून घेतलेली सारी दक्षता उद्ध्वस्त करून या सरपंचाने आपला आवाज उठवला. राहुल गांधी यांचे नशीब असे की या सरपंचाने त्यांना अडचणीत आणणारे काही प्रश्न विचारले नव्हते आणि राहुल गांधी यांच्या क्षमतेची परीक्षा पाहिलेली नव्हती. आधीच कॉंग्रेसचे नेते नरेंद्र मोदी यांचा प्रभाव कमी कसा करावा यावर विचार विनिमय करीत आहेत. त्यासाठी जे काही करायला जावे ते अंगलट येत आहे. अशातच २०१४ सालची लोकसभेची निवडणूक आव्हान म्हणून समोर उभी आहे. त्यातल्या त्यात उत्तर भारतात पक्षाचा पाया खचला आहे आणि आता मतदारांंना आकर्षित करण्याची पूर्ण मदार ज्या राहुल गांधी यांच्यावर आहे त्या राहुल गांधी यांचा प्रभाव पडेनासा झाला आहे. कॉंग्रेससाठी ही निवडणूक १९७७ सालनंतरची सर्वात अवघड निवडणूक आहे. महागाई आणि भ्रष्टाचार या दोन दोषांवर मात करून ही निवडणूक कशी जिंकावी हा यक्ष प्रश्न कॉंग्रेस नेत्यांना सतावत आहे. राहुल गांधी यांचा प्रभाव पडत नसल्यास सोनिया गांधी यांनी आता पुढे आले पाहिजे पण त्या येत नाहीत. त्यांनी आपला सगळा भार राहुल गांधी यांच्यावर टाकल्याने त्यांना तो सहन होत नाही.
२००४ पासून त्यांना अनेकदा सरकारात मंत्री म्हणून संधी मिळाली असती पण त्यांनी ती नाकारली आणि टाळली. पण तसे न करता त्यांनी ती स्वीकारली असती तर आता त्यांचा अनुभव आणि क्षमता यात ङ्गार मोठा ङ्गरक पडला असता पण आता ते अननुभवी ठरत आहेत. २०१४ च्या आव्हानात आता सोनिया गांधी कोठेही दिसत नाहीत. कॉंग्रेसच्या पोस्टर्सवरही राहुल गांधी यांची एकट्याचीच छबी झळकत आहे. सोनिया गांधी नाही तरी नाही पण अजूनही ज्यांची विश्वासार्हता टिकून आहे त्या मनमोहनसिंग यांचा तरी ङ्गोटो झळकायला हवा होता. पण तेही उदासीन आहेत. सोनिया आणि मनमोहनसिंग यांच्या या उदासीनतेची कारणे काय असावीत यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ते आता केवळ काळकाढूपणा करीत आहेत. त्यांना एकदाची निवृत्त होण्याची घाई झाली आहे. कदाचित युपीए आघाडीला पुन्हा संधी मिळाली तरीही आपण आता तिसर्यांदा पंतप्रधान होणार नाही हे त्यांंना कळून चुकले आहे. तशी चर्चा जरी झाली तरीही कॉंग्रेसमध्येच असलेला त्यांच्या विरोधातला गट उचल खातो हेही ते जाणून आहेत. त्यांचे नाव कोळसा घोटाळ्यात पुढे आले तेव्हापासून त्यांच्या चाहत्यांनीही त्यांच्यापासून दूर राहणे पसंत केले अाहे. कदाचित या प्रकरणात ते दोषी ठरले तर काय करावे ? म्हणून अनेक नेते त्यांच्यापासून ङ्गटकून वागत आहेत. परिणामी मनमोहन सिंग यांना काही उत्साह राहिलेला नाही.
सोनिया गांधी या आता आपल्या चिरंजीवावर पूर्णपणे विसंबून आहेत. राहुल गांधी हे आपल्या हिंमतीवर पंतप्रधान होणार असतील तर त्यांनी व्हावे असा विचार सोनिया गांधी यांनी केला असावा. केन्द्रात सत्तेवर येण्याबाबत सोनिया गांधी यांचे राहुल गांधी यांच्यावर एवढे विसंबून राहणे त्यांना ङ्गार महागात पडणार आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांना तूर्तास तरी एक समाधान आहे. मोदी यांचा प्रभाव पडत असला तरी भाजपाचा प्रभाव नेहमीच शहरांत असतो. त्यामुळे त्यांनी माध्यमांत कितीही गवगवा केला तरीही तिथे मागे पडलेला कॉंग्रेस पक्ष ग्रामीण भागातल्या मतांच्या आधारावर बाजी मारून जाईल असा विश्वास कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे पण ग्रामीण भागात आता टीव्ही पोचला आहे. त्याच्या माध्यमातून मोदी हेही ग्रामीण भागात पोचले आहेत. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला ग्रामीण भागातून पाठिंबा मिळेल हा त्यांचा विश्वास अनाठायी ठरण्याची शक्यता आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल गांधी गेल्या १५ वर्षांपेक्षा अधिक काळ राजकारणात आहेत पण त्यांनी प्रथमच एवढा मोठा पुढाकार घेतला आहे. त्यात ते ङ्गार मोठी मजल मारण्याची शक्यता नाही. आता कॉंग्रेसने आता आपले नेहमीचे चलनी नाणे सोनिया गांधी यांना मैदानात उतरवले पाहिजे. प्रियंका गांधी याही प्रभाव निर्माण करू शकतात. सोनिया आणि प्रियंका या दोघी मोदींचा प्रभाव कमी करू शकतील असा विश्वास आहे पण त्या उतरत नाहीत. राहुल गांधी यांच्यावरच भार टाकत आहेत.