नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँकेने परदेशी बँकांच्या शाखांना भारतातल्या खाजगी बँका ताब्यात घेण्याची तसेच आपल्या शाखा भारतात कोठेही उघडण्याची अनुमती दिली आहे. या बँकांना भारतातल्या कोणत्याही शेअर बाजारामध्ये आपले नाव नोंदविण्याचीही अनुमती देण्यात आली आहे. असे असले तरी या बँकांवर काही निर्बंधही घालण्यात आले आहेत.
या परदेशी बँका भारतातल्या ज्या बँकांवर ताबा मिळवतील त्या बँकांमध्ये त्यांना एकूण भांडवलाच्या ७४ टक्क्यांपेक्षा अधिक भांडवल गुंतवता येणार नाही. अशा प्रकारे भारतातल्या खाजगी बँका घेऊन त्या चालवणार्या परदेशी बँकांना पूर्णपणे भारतीय बँकेचा दर्जा दिला जाईल आणि भारतीय बँका ज्याप्रमाणे कोठेही आपल्या शाखा काढू शकतात तशाच याही बँकांना शाखा काढता येतील.
अशा नव्या शाखा काढताना भारतातल्या स्थानिक बँकांना रिझर्व्ह बँकेची अनुमती घ्यावी लागते, तशी याही बँकांना घ्यावी लागेल. केंद्र सरकारच्या धोरणानुसार रिझर्व्ह बँकेने या बँकांना अशी खुली छुट दिली असली तरी भारतातल्या बँकींग क्षेत्रात मात्र या धोरणामुळे नाराजी पसरली आहे.