पुन्हा भडकणार कांदा

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कांही दिवसांपूर्वीच कांदा क्रायसिस संपल्याची घोषणा केली असली आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आगामी कांही दिवसांत कांद्याचे भाव उतरतील असा विश्वास व्यकत केला असला तरी कृषी विभागाने नुकत्याच पार पाडलेल्या सर्वेक्षणचे अहवाल कांही निराळेच सांगत आहेत. आगामी कांही दिवसांत कांद्याच्या किमती पुन्हा गगनाला भिडतील असे संकेत या सर्वेक्षणात काढण्यात आले आहेत.

हिवाळी कांद्याची आवक देशभरात नोव्हेंबरपासून सुरू होते. याच आशेवर कांदा दर उतरतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र कृषी विभागाने कांदा उत्पादक राज्यांच्या केलेल्या पाहणीत हिवाळी कांद्याचे अतिपावसामुळे सुमारे ४० टक्के नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. परिणामी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणारा कांदा पुरेसा आलेलाच नाही.

महाराष्ट्रात साठवलेल्या कांद्याचे पावसाने मोठे नुकसान केले आहे तर गुजराथ,कर्नाटक, आंध्रात जादा पावसाने कांदा शेतातच कुजला आहे. बिहार मध्येही कांदा पीक बेताचेच आले आहे. प्रथम दुष्काळामुळे कांदा पीक धोक्यात आले व भाव १०० रूपयांपर्यंत चढले होते तर आता हिवाळी कांद्याचे पीकच कमी आले आहे. गुजराथ, बिहार, कर्नाटक आंध्रात पीक २५ ते ३० टक्कयांनी घटले आहे.

महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सोलापूर, अहमदनगर या चार प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यात पावसामुळे साठवलेल्या कांद्याचे पावसाने मोठे नुकसान केले आहे. सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगांव कृषी उत्पन्न समितीचे अद्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार येथे नोव्हेंबरपासून दररोज २५ हजार क्विटल कांदा येत असतो मात्र यंदा हे प्रमाण २५०० ते ३ हजार क्विटलवर आले आहे. पावसाची अजूनही हजेरी लागत आहे यामुळे कांदापीक धोक्यात आले आहे. परिणामी आगामी कांही दिवसांत कांद्याचे भाव पुन्हा गगनाला भिडतील असे संकेत मिळत आहेत.

Leave a Comment