कोहलीच मोडणार शतकाचा विक्रम-गावस्कर

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहली नियमितपणे शतके ठोकत आहे, हे पाहून भारताचा माजी कप्तान सुनील गावस्कर भारावला आहे. आगामी काळात सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेटमधील ४९ शतकांचा विक्रम कोहलीच मोडीत काढू शकेल, असे मत गावस्करने व्यक्त केले.

आतापर्यंत विराट कोहलीने ११२ एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले असून, यामध्येे त्याने १७ शतकांच्या साहाय्याने ४ हजार ९१९ धावा केल्या आहेत. सचिनने इतक्याच सामन्यांमध्ये आठ शतकांनिशी ४००१ धावा केल्या होत्या. कोहली ज्या पद्धतीने शतके झळकावत आहे, ते पाहता तो सचिनचा ४९ एकदिवसीय शतकांचा विक्रम मोडू शकेल, असे गावस्करने म्हटले आहे.’

‘विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. परंतु सचिनचे काही विक्रम हे मोडणे केवळ अशक्यप्राय आहे. २०० कसोटी सामने खेळणे आणि त्यात ५१ शतके झळकावणे, या विक्रमापर्यंत पोहोचणे कठीण आहे,” असे गावस्कर यांनी सांगितले. ”एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहली ज्या रितीने खेळतो आहे, ते पाहता सचिनचा ४९ शतकांचा विक्रम मोडणे त्याला शक्य होईल. कोहलीला आता ३२ आणखी शतकांची आवश्यकता आहे. येत्या हंगामातच कोहलीच्या खात्यावर २० किंवा २२ शतके जमा असतील,” असे गावस्करने यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Leave a Comment