दिवाळी: प्रकाशाचा महोत्सव,विश्वाचा महोत्सव

पुणे- दिवाळीच्या निमित्ताने आलेला अनुभव कायम लक्षात राहण्यासारखा आहे. ˆ पत्रकारितेतील एक जुने जिवलग स्नेही अब्दुल हमीद खान यांचा दोन दिवसापूर्वी फोन आला. दिवाळीच्या भेटकार्डावर काय ओळी टाकाव्यात अशी त्यांची विचारणा होती.

त्यांना मी काही तरी सुचविणार येवढ्यात त्यांनीच मला ’सुचले आहे ते बरोबर आहे का’ असे विचारले. कोणत्याही मित्रांची मित्राशी संवादाची सर्वसाधारणपणे हीच पद्धती असते. पण त्यानी जे मला सुचविले ते थक्क करणारे होते. ते म्हणाले, श्रीमद् भगवद्गीतेत कोणत्या प्रकाशाचा उल्लेख आहे ते मला सांगा.’ मी माझ्या आठवणीनुसार एक एक अध्यायाचे विषय आठवू लागलो. तेवढ्यात तेच म्हणाले, असा एक उल्लेख असल्याचे मला स्मरते की, परमेश्वरा ! तू आतापयर्र्त जीवनातील अनेक विभूती सांगितल्यास पण त्यातूनही तू बराच व्यापक उरतोस. त्याचे स्वरूप मला दाखव. त्यावर म्हणे (इति खान) भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, त्याची व्यापकता मोठी आहे, ते बघायला मोठी दृष्टी लागते. तर परमेश्वरा ! ती दिव्य दृष्टी कोणती ती मला आपण द्या’ ती दिव्य दृष्टी त्या दृष्टीला दिसलेला प्रकाश तो कोणता प्रकाश मला सांगा! असा माझा मित्र अब्दुल हमीद खान यांचा मला फोन आला.

अब्दुल हमीद खान आणि मी दैनिक मराठा मधील संपादकीय सहकारी. गेली तीन दशके ते राष्ट्रीय चरित्र माला हा कोष प्रकाशित करत आहेत, त्यामुळे ते असाच काही प्रश्न विचारणार हे मला माहीत होते पण एकदम अकराव्या अध्यायातील विश्वरूप दर्शनातील प्रकाशाची कल्पना त्यांना दिवाळीचा प्रकाश म्हणून सुचेल, अशी मी कल्पनाही केली नव्हती. मी माझ्या पद्धतीने त्यांना उत्तर दिले व त्यानुसार तासाभरात त्यांचे ग्रिटिंगही आले.

त्यातून माझी एक खात्री झाली की, दिवाळी हा खर्‍या अर्थाने भारतीयांचा दीपोत्सव आहे. यावर्षी तर अमेरिकन संसदेच्या दोन्ही सदनांनी हा महोत्सव साजरा करण्यास घेतला आहे. यापूर्वी ब्रिटिश संसदांनी व त्या देशातील अनेक संस्थांनी हा महोत्सव त्यांचा मानला आहे. युरोपीय देश हा सण साजरा करतात. आग्नेय आशियात तर अशी समजूत आहे की, हा सण आग्नेय आशियातून भारतात गेला आहे.

ब्रह्मदेशात असे मानले जाते की, ब्रह्म म्हणजे प्रकाश. नेपाळ, तिबेट व चीनमध्येही हा सण त्यांचा वाटतो. गेल्या काही दिवसापासून म्हणजे चीनमध्ये पोलादी भिंतींनी वेढलेली राजवट संपल्यावर त्यांनी प्रथम कोणती संस्कृती आपली मानली असेल तर ती बौद्धविचाराची भारतीय संस्कृती. त्यातही या दीपोत्सवाला महत्व आहे. त्यामुळे हा सार्‍या जगाचा महोत्सव आहे.

देशात आणि सार्‍या शहरात हा सण कसा साजरा करतात हा विषय सर्वांना परिचित आहे. पण पुण्यात आज चैतन्य हास्य मंडळाने ज्या पद्धतीने हा सण साजरा केला आहे ते बघण्यासारखे आहे. पुण्यात शंभरपेक्षा अधिक मंडळे असलेला हा क्लब . पुण्यात तीस हजारापेक्षा त्यांचे सदस्य आहेत. हास्ययोग हा त्यांचा विषय. तो कशा पद्धतीने मांडतात हे आतात महाराष्ट्रात सर्वत्र माहीत असलेला विषय आहे.पण गेली काही वर्षे ते एक दिवाळीच्या पहिल्या दिवशी एक औचित्यपूर्ण उपक्रम राबवतात. तो म्हणजे शिवाजी महाराजयांच्या प्ररणेने स्थापन झालेल्या हिंदवी स्वराज्याला उत्तरेत जावून सारे मोंगलांचे आक्रमण पराभूत करण्याचे सामर्थ्य ज्या शनिवारवाड्यात एकवटले, तो शनिवारवाडा एक लाख दिवे लावून उजळवून टाकतात. संध्याकाळी हा कार्यक्रम सुरु होतो व रात्री अपरात्रीपर्यंत ते तेज बघण्यासारखे असते.

Leave a Comment