दादा कोंडकेच्या जीवनपटावर सिनेमा येणार

आता आगामी काळात मराठी सिनेमातील अभिनेते-दिग्दर्शक दादा कोंडके यांच्या जीवनावर आधारित मराठी सिनेमा येणार आहे. अनिता पाध्ये यांनी शब्दांकन केलेल्या दादा कोंडके यांच्या ‘एकटा जीव’ या आत्मचरित्रावर आधारित हा सिनेमा असणार आहे. आठ ते दहा महिन्यांपूर्वी अभिनेता अक्षयकुमारने या पुस्तकाचे हक्क विकत घेतले असून तो दादा कोंडकेच्याा जीवावर आधारित सिनेमाची निर्मिती करण्याचा विचार करीत आहे.

मराठी रंगभूमीवर ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाद्वारे नवा इतिहास निर्माण करणारे आणि त्यानंतर मराठी चित्रपटांच्या इतिहासात स्वत:ची खास शैली निर्माण करून ओळीने नऊ चित्रपट रौप्यमहोत्सवी करून दाखविणारे अभिनेते-दिग्दर्शक दादा कोंडके यांच्या आत्मचरित्राला वाचकांचाही ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद मिळत असून याच महिन्यात पुस्तकाची नववी आवृत्ती प्रकाशित झाली आहे.

दादांचे आयुष्य विविध नाटय़पूर्ण घटनांनी भरलेले होते. या पुस्तकात त्यांच्या आयुष्याचा सर्व पट उलगडला गेला आहे. दादांनी या आत्मचरित्रात आयुष्यात जे काही घडले ते सर्व काही सांगितले आहे. या सर्व गप्पा ध्वनिमुद्रित केल्या आहेत. आठ ते दहा महिन्यांपूर्वी अभिनेता अक्षयकुमारने या पुस्तकाचे हक्क विकत घेतले असून याच पुस्तकाच्या आधारे दादा कोंडके यांच्या जीवनावर अक्षयकुमारच्या ‘ग्रेझिंग गोट प्रॉडक्शन’तर्फे सिनेमाची निर्मिती केली जाणार आहे.