पृथ्वीपासून सर्वात दूरवर सापडली आकाशगंगा

वॉशिग्टन – पृथ्वीपासून आतापर्यंतची सर्वात दूर असलेली 13 अब्ज प्रकाशवर्षे अंतरावरील आकाशगंगा खगोलशास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. पृथ्वीप्रमाणे अंतराळातील अन्य ग्रह व ता-यांचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत. याने, उपग्रह, दुर्बिणीच्या साहाय्याने नवनवीन शोध लागत आहेत. पृथ्वीपासून आतापर्यंतची सर्वात दूर असलेली 13 अब्ज प्रकाशवर्षे अंतरावरील आकाशगंगा खगोलशास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे.

या मोठया उपक्रमात भारतीय शास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल तिळवी हेही सहभागी झाले होते. ही आकाशगंगा 13 अब्ज प्रकाशवर्षे आहे. याचाच अर्थ विश्वाचे वय 13.7 अब्ज आहे, अशी माहिती टेक्सास येथे ए अ‍ॅँड एम विद्यापीठातील प्राध्यापक आणि या संशोधनातील सहलेखक डॉ. विठ्ठल तिळवी यांनी सांगितले. खगोलशास्त्रासाठी हा शोध अत्यंत महत्त्वाचा आहे. या आकाशगंगेच्या शोधामुळे विश्वाचे नेमके वय काढता येणे शक्य होणार आहे, असे तिळवी यांनी सांगितले. हे संशोधन नेचर’ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

डॉ. स्टीव्ह फीनकेलस्टाइन यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला. आम्ही अनेक आकाशगंगांचा शोध घेत होतो. मात्र आम्हाला केवळ दूरवरची एकच आकाशगंगा सापडली. हे विश्व तरुण असताना त्यात मूलभूत काही बदल आहेत, हे आमच्या लक्षात आले, असे तिळवी यांनी सांगितले. विशेष म्हणजे आपल्या सूर्यासारखे 300 तारे दरवर्षी तयार होत आहेत. जेव्हा विश्व तरुण होते तेव्हा आतापेक्षा आकाशगंगा या अधिक क्रियाशील होत्या. आमचा जन्म आता झाला ही सुदैवाची बाब आहे. कारण काही अब्ज वर्षानंतर विश्व अधिक मोठे बनणार आहे. त्यामुळे दूरवरच्या आकाशगंगेतील प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, असा दावा तिळवी यांनी केला.

जायंट मॅगेलन टेलिस्कोप’ आणि थर्टी मीटर टेलिस्कोप’ या नवीन दुर्बिणी अमेरिकेने बनवल्या आहेत. यातील थर्टी मीटर टेलिस्कोप’ ही दुर्बीण बनवण्यात भारताने मदत केली आहे. गोव्यात जन्मलेल्या तिळवी यांनी दोना पावला येथील राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय अंटार्क्टिका संशोधन केंद्रात काम केले आहे.

Leave a Comment