स्फोटापेक्षा केंद्रीय गृहमंत्र्यांना रज्जो’चे लाँच महत्त्वाचे!

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना रज्जो’ने मोहिनी घातली आहे. त्यामुळेच की काय रविवारी गृहमंत्री रज्जोच्या म्युझिक लाँचला महत्त्व दिले. पाटणा साखळी स्फोटानंतर गृहमंत्री घटनास्थळाला भेट देऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र सुशीलकुमार शिंदेंनी त्याऐवजी मुंबईत येऊन रज्जो’ सिनेमाचं म्युझिक लॉन्च करण्याला महत्व दिले.

पाटण्यात साखळी स्फोट झाल्यावर आणि देशभरात हाय अलर्ट असतानाही देशाचे गृहमंत्री सुशील कुमार शिंदे मात्र एका सिनेमाच्या म्युझिक लाँच कार्यक्रमात मशगूल होते. पुन्हा त्यांनी आपला मुंबईतील कार्यक्रम हा पूर्वनियोजित असल्यामुळे त्यासाठी हजर राहण्यात काहीच गैर नाही, असे या दौर्‍याचे समर्थनही केले आहे.

विश्वास पाटील यांच्या रज्जो’ या सिनेमाचं काल केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते मुंबईत म्युझिक लाँच झाले. पाटण्यात बॉम्बस्फोट झालेले असतानाही आपण मुंबईत राहून सतत पाटण्यातील अधिकार्‍यांच्या आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संपर्कात असल्याचंही शिंदे यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला शिंदे यांच्यासह या सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक विश्वास पाटील, अभिनेत्री कंगना राणावत, पराग अरोरा, संगीतकार प्रितम सिंग यांच्यासह इतर सेलिब्रिटीही उपस्थित होते.

Leave a Comment