खेडमध्ये चोरट्यांनी फोडले तहसीलदारांचेच घर

खेड- शहरातील वाणीपेठ येथील महाकाळ कॉम्लेक्समधील गांधी यांच्या घरामध्ये दिवसाढवळ्या झालेल्या चोरीनंतर पुन्हा एकदा शहरात चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. खेड-भरणे मार्गावरील कृष्णकुंज या इमारतीमधील तहसीलदार प्रकाश संकपाळ यांचा बंद फ्लॅट अज्ञात चोरटयांनी फोडून रोख रकमेसह सुमारे पन्नास हजारांचा ऐवज लांबवला आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

खेड-भरणे मार्गावरील कृष्णकुंज अपार्टमेंटमधील ए विंगमध्ये तहसीलदार प्रकाश संकपाल यांचा फ्लॅट आहे. शनिवारी सकाळी ते आपल्या कुटुंबीयांसमवेत कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. त्यामुळे त्यांचा फ्लॅट बंद होता. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरटयांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा धारधार हत्याराने उचकटून दरवाजा तोडला.

दरवाजा तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या रूममधील दोन लोखंडी कपाटे चोरटयांनी फोडली. कपाटातील कपडे, दाग-दागिन्यांसह अन्य साहित्य अस्ताव्यस्त करून टाकले. तसेच कपाटातील रोख रक्कम 42 हजार, चांदीची प्लेट व दागिने असा एकूण पन्नास हजारांचा ऐवज चोरटयांनी लांबवला. चोरटयांनी मोठया रकमेसह दागिन्यांवर डल्ला मारला तर कपाटातील चिल्लर तशीच ठेवून गेल्याचे पोलिस तपासाच्या वेळी समोर आले.

रविवारी पहाटे तहसीलदार संकपाळ मुंबईतून खेडला आले. साडेचारच्या सुमारास ते फ्लॅटवर गेले तेव्हा त्यांना फ्लॅटचा मुख्य दरवाजा उघडा दिसला. यावेळी फ्लॅटमध्ये पाहणी केली असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच पोलिस ठाण्यात धाव घेऊन चोरीची खबर दिली. त्याप्रमाणे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

काही दिवस तालुक्यातील चो-यांचे प्रमाण कमी झाले, असे वाटत असतानाच शनिवारी रात्री चोरटयांनी तालुक्याच्या दंडाधिका-यांचा फ्लॅट फोडून पोलिसांना नवे आव्हानच दिले आहे. यातून चोरटयांची एक टोळी गजाआड असताना आता दुसरी टोळी सक्रिय झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

Leave a Comment