३० जागा द्या आंध्राचे विभाजन रद्द करतो : जगनमोहन

हैदराबाद – आंध्र प्रदेशातल्या जनतेने वायएसआर कॉंग्रेस पक्षाला लोकसभेच्या ३० जागा द्याव्यात, आपण राज्याचे विभाजन रद्द करून दाखवू असे वचन या पक्षाचे नेते माजी खासदार जगनमोहन रेड्डी यांनी काल हैदराबाद येथील जाहीर सभेत बोलताना दिले. आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगणाची निर्मिती करणे हे सोनिया गांधी यांचे कारस्थान आहे. त्या तेलुगू जनतेच्या जीवाशी खेळत आहेत. जनतेच्या भावना विचारात न घेता तेलंगण राज्याची निर्मिती करून त्यांनी दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या केली आहे, असा जोरदार हल्ला त्यांनी चढवला.

सोनिया गांधींना आंध्र प्रदेशाचा इतिहास माहीत आहे का, असा सवाल करून जगनमोहन रेड्डी यांनी, सोनिया गांधी आपल्या मुलाला पंतप्रधान होणे सोपे जावे यासाठी आंध्र प्रदेशाच्या पुढच्या पिढ्यांच्या भवितव्याशी खेळ करत आहेत, असा आरोप केला. जगनमोहन यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर हैदराबादेत झालेली ही पहिलीच सभा होती. त्यांनी सर्व राजकीय पक्षांना आंध्राचे विभाजन थांबविण्याचे आवाहन केले.

आज आंध्र प्रदेशाचे विभाजन होत आहे. उद्या हीच साथ पसरली तर पश्‍चिम बंगाल, तामिळनाडू, ओदिशा, कर्नाटक एवढेच नव्हे तर पंजाबच्याही विभाजनाची मागणी केली जाईल असा इशारा देऊन जगनमोहन रेड्डी यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पंजाबचे विभाजन झालेले चालेल का, असा सवाल केला. सध्या आपण आंध्र प्रदेशाचा लढा लढवत आहोत, पण हा लढा दिल्लीतील राज्यकर्त्यांचा उर्मटपणा आणि आंध्रातील जनतेच्या आकांक्षा यांच्यातला लढा आहे, असे ते म्हणाले.

आंध्र प्रदेशाच्या जनतेने येत्या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाला ३० जागा द्याव्यात, असे आवाहन करून जगनमोहन रेड्डी यांनी ‘मग बघतो आंध्राचे विभाजन कसे होते ते?’ असा इशाराच दिला. त्यांनी तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्यावरही टीका केली.

Leave a Comment