पाटण्यातील बॉम्बस्फोटांमागे षडयंत्र- नीतिश कुमार

पाटणा – पाटण्यातमधे झालेल्या स्फोटांमागे बिहारमधलं सामाजिक वातावरण बिघडवण्याचं षडयंत्र असल्याचा संशय मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या हुंकार रॅलीच्या मैदानात आज रॅली सुरू होण्याआधी 5 स्फोट झाले तर एक स्फोट पाटणा रेल्वे स्थानकात झाला. या स्फोटात 5 ठार आणि 72 जखमी झाले.

दरम्यान या स्फोटांप्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. स्फोटांनंतर झालेल्या तपासणी दरम्यान अजून 4 जिवंत बाँब मिळाले. ते तातडीने निकामी करण्यात आले. हे बाँब निकामी करताना आणखी एक स्फोट झाला. त्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे.

भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्‍वभूमीवर पाटणा येथे आज सकाळी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निषेध केला आहे. नितीश कुमार यांनी तातडीने या साखळी बॉम्बस्फोटांचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले असून वेळ पडल्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) मदत घ्यावी, असेही सांगितले आहे.

नितीश कुमार आज मुंगेर येथे आंतरराष्ट्रीय योग परिषदेला जाणार होते. परंतु स्फोट झाल्याची माहिती समजताच, त्यांनी आपला नियोजित दौरा रद्द केला आहे. या साखळी बॉम्बस्फोटांबद्दल नितीश कुमार यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही लोक राज्याची एकता आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. या स्फोटांबाबत गुप्तचर विभागाने कोणत्याही सुचना दिल्या नव्हत्या. यामुळे सुरक्षेच्या तृटींमुळे हे स्फोट घडले नाहीत. स्फोटातील मृतांच्या परिवराला 5 लाखांची मदत करणार असल्याची माहिती नितीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.