फ्रान्स बॅडमिंटनमध्ये सायना, सिंधू विजयी

पॅरिस – फ्रान्स सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी विजयी सलामी दिली. मात्र ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा या जोडीला सलामीच्या लढतीतच पराभवाचा धक्का बसला. डेन्मार्क येथील स्पर्धेत सिंधूला सलामीच्या लढतीतच धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र या पराभवातून सावरत सिंधूने पुनरागमन केले.

या स्पर्धेत चौथ्या मानांकित सायनाने थायलंडच्या निचाऑन जिंदापॉनवर १२-२१, २१-१६, २१-१३ अशी मात केली. पहिल्या गेममध्ये ब-याच चुका करत तिने हा गेम गमावला. दुस-या गेममध्ये १२-१२ अशी बरोबरी असताना सायनाने सलग पाच गुणांची कमाई करत आगेकूच केली आणि दुसरा गेम आपल्या नावावर केला. तिस-या गेममध्येही अटीतटीच्या मुकाबल्यात १४-१३ अशी गुणस्थिती होती मात्र त्यानंतर सलग सात गुण पटकावत सायनाने तिस-या गेमसह सामना जिंकला. दुस-या फेरीत सायनाची लढत कोरियाच्या यिआन ज्यु बेईशी होणार आहे.

डेन्मार्क येथील स्पर्धेत सिंधूला सलामीच्या लढतीतच धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र या पराभवातून सावरत सिंधूने पुनरागमन केले. तिने कोरियाच्या जि ह्य़ुन स्युंगवर २१-८, २१-१२ असा विजय मिळवला. स्युंगनेच डेन्मार्क सुपर सीरिज स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात आणले होते. सिंधूने प्रदीर्घ रॅली, नेटजवळून सुरेख खेळाच्या जोरावर स्युंगला निष्प्रभ केले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूने कांस्यपदकाची कमाई केली होती.

Leave a Comment