मनमोहनसिंग – ली क्विंग यांच्या सीमा सुरक्षा करारावर स्वाक्षर्‍या

बिजिंग – चीनच्या दौर्‍यावर असलेले भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि चीनचे पंतप्रधान ली क्विंग यांच्यात अनेक विषयांवर चर्चा आजपासून म्हणजे बुधवारपासून सुरू होत असतानाच या दोन्ही देशांनी सीमा सुरक्षेच्या करारावर स्वाक्षर्‍या केल्या असल्याचे वृत्त आहे. याचवेळी नालंदा विश्वविद्यालयासंदर्भातल्या एका मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिगवरही सह्या करण्यात आल्याचे समजते. अर्थात व्हीसा प्रश्नावर मात्र अद्याप तरी कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.

भारताने चीन भारतीयांना देत असलेल्या स्टेपल्ड व्हिसासंदर्भात यापूर्वीच आक्षेप नोंदविला आहे. अरूणाचल प्रदेशातील दोन खेळाडूंना चीनने स्टेपल्ड व्हिसा दिल्यानंतर भारताने व्हिसा समझोत्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यावर अजून तरी कोणताही मार्ग सापडलेला नाही.

भारत आणि चीनच्या व्यापारात मोठ्या प्रमाणात तफावत आहे. ही तफावत कमी करण्यासाठी चीनने भारतात मोठया प्रमाणात गुंतवणूक करावी, असे आवाहन मनमोहन सिंग यांनी मंगळवारी केले. प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. भारत आणि चीनच्या व्यापारात 20 अब्ज डॉलर्सची तफावत आहे. चीनने भारतात थेट परकीय गुंतवणूक वाढवल्यास ही तूट कमी होऊ शकते. चीननेभारतात औद्योगिक वसाहती स्थापन करण्यास अनुकूलता दर्शवली आहे. आम्ही या संकल्पनेचे स्वागत करतो, असे पंतप्रधानांनी सांगितले.

सीमारेषेवर असलेल्या तणावावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीनने पुन्हा एकदा हातमिळवणी केली. दोन्ही देशात सीमा सुरक्षेसंबंधी करार करण्यात आला आहे. त्याशिवाय पाणी, वीज आणि नालंदा विद्यापीठासाठी दोन्ही देशांदरम्यान सामंजस्य करार करण्यात आले. ब्रह्मपुत्रेसारख्या दोन्ही देशांमधून वाहणार्‍या नद्यांच्या पाण्याच्या वाटपावरून दोन्ही देशांमध्ये वाद आहे. त्यामुळे पाण्याच्या वाटप करण्यासंबंधी करार करण्यात आला.

कराराअंतर्गत चीन भारतामध्ये वीज उपकरणे सेवा प्रकल्प उभारणार आहे. बिहारमध्ये नालंदा विद्यापीठाच्या उभारणीसाठी चीन भारताला मदत करेल. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे भारत आणि चीनच्या शहरांमध्ये सिस्टर सिटी रिलेशन विकसित करण्याचाही प्रस्ताव आहे. आसाठी भारतातील बंगळुरू आणि कोलकाता या शहरांची निवड करण्यात आली आहे. 2013 ते 2015 या कालावधीदरम्यान सांस्कृतिक देवाणघेवाण होईल. पंतप्रधानपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर आपण सर्वात आधी भारताचा दौरा केला, याकडे चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी लक्ष वेधले. तर दोन्ही देशांमधल्या सीमेवर शांतता असल्याशिवाय द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होणार नाहीत असं पंतप्रधान डॉ. सिंग यांनी ठणकावून सांगितले.

Leave a Comment