पारनेर- शैक्षणिक संस्थेच्या वादातून पारनेर तालुक्यातील हंगा येथे दोन गटात झालेल्या मारामारीत सुपा पोलिसांनी राळेगण सिध्दीचे सरपंच जयसिंग मापारी यांच्यासह सुरेश पठारे व शिवसेना तालुकाप्रमुख निलेश लंके आदि 15 जणांवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.
पोलिसांनी आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केली. याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हंगा येथे गट क्रमांक 277 मध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा चालू आहे. या संस्थेचे विश्वस्त भगवान पठारे व चालक अश्विन गिरी यांच्यात या संस्थेवरुन अंतर्गत वाद होते. हा वाद गेल्या वर्षभरापासून चालू होता. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. यासंबंधी कल्पना पठारे यांनी फिर्याद दिली असून यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, हंगा येथील या शाळेच्या आवारात 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अश्विन गिरी यांना या इंग्रजी शाळेच्या संस्थेतून निलंबनाची नोटीस देण्यासाठी गेले असता गिरी व त्यांची पत्नी दीपाली व भाचे किरण मोरे व ऋषिकेश मोरे यांच्यासह चार ते पाच जणांनी काठी व इतर शस्त्राने मारहाण केली. तसेच अश्लिल वर्तन केल्याची फिर्याद देण्यात आली.
यावरून सुपा पोलिसांनी अश्विन गिरी यांच्यासह 4 ते 5 जणांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. शाळा व्यवस्थापनाचे अश्विन गिरी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास संस्थेचे विश्वस्त भगवान पठारे यांच्यासह काही जण या ठिकाणी आले व संस्था मला मिळाली आहे, तुम्ही येथून निघून जा, असे म्हणून भगवान पठारे, जयसिंग मापारी, सुरेश पठारे, निलेश लंके, गणेश साळवे, अतुल लोखंडे, गणेश सालके, संतोष ढवळे, राजू शिंदे, संजय पठारे, गणेश पठारे, किसन पठारे, रंगनाथ सालके, सुयोग सालके यांनी मला व माझी पत्नी दीपाली व सासरे चंद्रप्रकाश बाबाजी कदम व सासू सुनिता चंद्रकांत कदम यांना काठी व गजाने मारहाण केली आहे. दरम्यान याप्रकरणी परस्पराविरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोनि.किसन पडवळ हे करत आहेत.