सचिनच्या अखेरच्या सामना तिकीटांना परदेशातूनही मागणी

मुंबई – भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याच्या कसोटी कारकीर्दीच्या अखेरचा २०० वा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. या सामन्याच्या तिकीटांना केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही प्रचंड मागणी येत असल्याचे एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

पवार म्हणाले की सचिनची लोकप्रियता प्रचंड आहे. तो आता निवृत्त होत असल्याने केवळ क्रिकेट खेळणार्‍या देशांकडूनच नव्हे तर अमेरिकेतील लोकांकडूनही या शेवटच्या सामन्याच्या तिकीटांसाठी मागणी येत आहे. कारण भारताप्रमाणेच जगभरातले क्रिकेट प्रेमी सचिनच्या शेवटच्या सामन्याचे साक्षी होऊ पाहात आहेत.

पवार म्हणाले की या सामन्याच्या तिकीटांसाठी यापूर्वीच बीसीसीआय व अन्य सरकारी संस्थांना शब्द दिला गेला आहे. सचिनसाठी एमसीए ५०० तिकीटे देणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी किती तिकीटे उपलब्ध होतील हे आत्ताच सांगणे कठीण आहे. हा सामना पुढील महिन्यात ४ नोव्हेंबरला होत आहे.

Leave a Comment