नोटांवर झोपणार्‍या भाकप नेत्याची हकालपट्टी

आगरतळा – नोटांच्या बंडलांवर झोपणा-या त्रिपूरातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याला पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. समर आचारजी असे या नेत्याचे नाव आहे. नोटांच्या बंडलांचा बिछाना बनवून समर आचारजी त्यावर झोपला होता. कॅम-यामधील हे दुश्य सार्वजनिक झाल्यानंतर पक्षाने त्याच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे.

समरच्या कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे तसेच त्याने बेकायदा मार्गाने पैसा कमावला आहे असा आरोप करत माकपने त्याची पक्षातून हकालपट्टी केली. समर आचारजी पेशाने कंत्राटदार आहे. समर नोटांच्या बंडलांवर झोपल्याचे स्थानिक वाहिनीवरुन दाखवण्यात आले होते. मी बँकेतून आज वीस लाख रुपये काढले आणि ब-याच काळापासूनचे पैशांच्या बिछान्यावर झोपण्याचे माझे स्वप्न पूर्ण केले असे समर या चित्रफितीमध्ये बोलताना दिसत आहे.

पक्षाच्या नेत्यांकडे पैसा असूनही ते सामन्य असल्याचे दाखवतात पण मी इतर नेत्यांप्रमाणे असा दांभिकपणा करत नाही असे समर या चित्रफितीमध्ये म्हणताना दिसत आहे. पक्षाला 10 ऑक्टोंबरला समरच्या या कृत्याची माहिती मिळाली. त्यानंतर विभागीय समितीने नोटीस पाठवून त्याच्याकडून स्पष्टीकरण मागितले पण त्याने समधानकारक उत्तर दिले नाही त्यामुळे त्याला पक्षातून काढण्यात आले आहे असे दुकली विभागीय समितीचे सरचिटणीस सुब्रता चक्राबोर्ती यांनी सांगितले.