लखनौ – उत्तर प्रदेशातल्या उन्नाव येथील किल्ल्यात सोन्यासाठी उत्खनन सुरू होताच तिथे निघणारे सोने बघण्यासाठी लोटलेली रिकामटेकड्या लोकांची गर्दी आता ओसरायला लागली आहे. शोभन सरकार या साधूला झालेला स्वप्नातला कथित साक्षात्कार हा भ्रामक असल्याचे आता लोकांना कळायला लागले आहे. उत्खनन सुरू होताच तासाभरात सोन्याच्या चिपा वर यायला लागतील, अशा समजुतीपोटी तिथे गर्दी करणार्यांची ही समजूत चुकीची ठरली असल्याने त्यांची जिज्ञासा लोपली आहे.
दोन दिवसांपूर्वी हे उत्खनन सुरू झाले तेव्हा लोकांची एवढी गर्दी झाली होती की, त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. लोक किल्ल्यात तर आले होतेच पण ते उत्खनानाच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी सतत धडपडत होते आणि पुन्हा पुन्हा त्यांना लाठीमार करून मागे हटवावे लागत होते. तिथे जमलेली गर्दी विचारात घेऊन तिच्या सोयीसाठी काही लोकांनी चहाचे स्टॉल टाकले होते आणि काहींनी खाद्य पदार्थांच्या गाड्या लावल्या होत्या. आता गर्दी ओसरल्यामुळे हे व्यापारीही परत जायला लागले आहेत.
दरम्यान, पुरातत्व खात्याच्या अधिकार्यांनी या सार्या प्रकाराविषयी खुलासा केला आहे. या ठिकाणी उत्खनन सुरू झालेले आहे, परंतु त्या उत्खनानाचा या साधूला झालेल्या साक्षात्काराशी किंवा त्याच्या स्वप्नाशी काहीही संबंध नाही. पुरातत्व खात्याला काही शास्त्रीय माहितीनुसार तिथे काही धातू पुरलेले असावेत असा संंशय आला. तो धातू म्हणजे सोनेच आहे असेही या संशोधनात दिसलेले नाही. पण जो कोणता धातू असेल तो शोधण्यासाठी हे उत्खनन सुरू आहे. परंतु लोकांमध्ये साधूच्या साक्षात्काराच्या बातम्या पसरल्या आणि लोकांच्या झुंडी किल्ल्यात यायला लागल्या. आता मात्र झुंडी परत ङ्गिरायला लागल्या आहेत.