उनाव किल्लयात खोदकाम सुरू

उनाव – उत्तर प्रदेशातील ऊनाव जिल्ह्यात असलेल्या राजा रामबक्श सिग या राजाच्या पडिक किल्ल्यात हजारो टन सोने असल्याच्या वृत्तावरून पुरातत्त्व विभागाने या ठिकाणी सकाळी आठ पासून उत्खननाची सुरवात केली आहे. हे काम सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. येथील साधू शोभन सरकार याने मृत राजा स्वप्नात आल्याचे व त्याने किल्ल्यात हजारो टन सोने असल्याचे सांगितले होते. त्याची दखल केंद्र सरकारने घेऊन पुरातत्व विभागातर्फे हे खोदकाम हाती घेतले आहे. खोदकाम सुरू करण्यापूर्वी शोभन सरकारने दाखविलेल्या ठिकाणाची साग्रसंगीत पूजाही केली गेल्याचे समजते.

या खोदकामाच्या ठिकाणी नागरिकांची एकच गर्दी उसळली असून त्यात पत्रकार, पुरातत्व विभागाने अधिकारी व स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. पुरातत्व विभाग कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान न वापरता पारंपारिक रितीनेच हे खोदकाम करणार असल्याचे सांगितले जात आहे. राजा रामबक्श सिंग हा १८५७ च्या स्वातंत्र्यासाठीच्या बंडात शहीद झाला होता. त्याच्या वारसांनी किल्ल्यात सोने सापडले तर त्यावर त्याचा हक्क असल्याचा दावा यापूर्वीच केला आहे.