पुणे: अभिनेता संजय दत्तला वैद्यकीय कारणामुळे वाढीव रजा मिळाली आहे. त्याला आणखी १४ दिवसांची रजा मंजूर झाली आहे. त्यामुळे संजूबाबाला एकूण २८ दिवस तुरुंगाबाहेर राहण्याची संधी मिळाली आहे. त्या मुळे आगामी काळात त्याला उरलेली सर्व कामे पूर्ण करता येणार आहेत. संजय दत्तला या महिन्यात एक ऑक्टोबरलाच १४ दिवसांची सुट्टी मिळाली होती. त्यानंतर त्याला सोमवारी पुन्हा वाढीव रजा देण्यात आली आहे.
अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तला सुप्रीम कोर्टाने पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी संजय दत्तनं दीड वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे आणखी साडेतीन वर्षाची शिक्षा संजयला भोगायची आहे.
संजय दत्तला मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर शिक्षा भोगण्यासाठी २२ मे रोजी येरवडा कारागृहात हलवण्यात आले. मात्र तीन महिने उलटताच संजय दत्तने पॅरोलवर सुटण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. त्यासाठी त्याने अर्ज केला होता. त्यानंतर त्याची एक ऑक्टोबरला पॅरोलवर सुटका झाली आहे.