मुंबई- गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी हे शिवसेना सोडतील अशा अफवा पसरविल्याे जात आहेत. जोशी सर शिवसेना सोडतील हा विचार करणे चूक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी रायगड जिल्ह्यातील रोहा येथे दिली. आमची दोघांची दिल्लीतील भेट वैयक्तिक कामासाठी होती, त्याबाबत भाष्य कसे करणार, असेही पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी पुढे बोलताना पवार म्हणाले, माझी जोशी सरासोबत भेट झाल्यांनंतर शिवसेनेच्या नेतृत्वाबाबत जोशी यांनी काय विधाने केली, ते आपणास माहीत नाही. त्याचा संबंध त्यांच्या व आपल्या दिल्लीतील भेटीशी जोडणे योग्य नाही. भेटायला आलेल्यांचे स्वागत करणे हे सभ्यपणाचे लक्षण आहे. आमची ही भेट राजकीय स्वरूपाची नव्हती त्यामुळे यासंदर्भात विविध तर्कवितर्क लावणे चूकीचे ठरेल.
मनोहर जोशी हे शिवसेनेचे जबाबदार नेते आहेत. त्यामुळे एका राजकीय पक्षाच्या नेत्याला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न कोणी करून नये असे मला वाटते. एखादया प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्यायबाबत मिडीयाने काही छापू नये, असा सल्लाही यावेळी शरद पवार यांनी पत्रकारांना दिला.