परदेशी बँकांबाबत लवकरच निर्णय

वॉशिंग्टन – भारतात परदेशी बँकांना व्यवसाय करण्याची संधी देण्याचा विचार रिझर्व्ह बँक करत आहे आणि तसे धोरण लवकरच जाहीर केले जाईल असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी वॉशिंग्टनमध्ये बोलताना म्हटले आहे. हे धोरण जाहीर झाल्यास परदेशी बँका भारतात केवळ शाखाच काढू शकतील असे नाही तर भारतातल्या आजारी बँका ताब्यातसुध्दा घेऊ शकतील.

रघुराम राजन यांनी चलनविषयक धोरणाची नवी पंचसूत्री तयार केली असून या पंचसूत्रीतील कार्यक्रमात परदेशी बँकांना भारतात अनुमती देण्याचा मुद्दा हा प्रामुख्याने नमूद करण्यात आलेला आहे. येत्या दोन-तीन वर्षात ही आर्थिक सुधारणाविषयक पंचसूत्री अंमलात आणली जाणार आहे. हा कार्यक्रम येत्या महिनाभरात जाहीर केला जाईल.

परदेशी बँकांना स्वदेशी बँका ताब्यात घेण्याची अनुमती असेल परंतु त्यासाठी दोन अटी असतील असे रघुराम राजन म्हणाले. त्यातली पहिली अट म्हणजे ज्या परदेशी बँकेला भारतीय बँक ताब्यात घ्यावयाची असेल त्या बँकेच्या देशाच्या सरकारने तशी अनुमती द्यावी लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे आणि असा अन्य बँक ताब्यात घेण्याची कारवाई भारतातल्या अंगिकृत बँकेच्या मार्फत करावी लागेल किंवा भारतातल्या त्या बँकेच्या शाखेमार्फत करावी लागेल असे रघुराम राजन म्हणाले.