मुंबई- अमेरिकेतील शटडाउनचे जागतिक अर्थव्यवस्थेवर विविधांगी बरे-वाईट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारताचा चलनसाठा वाढवण्यासाठी रिझव्र्ह बँकेसाठी अमेरिकेत निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती पथ्यावर पडू शकते. परदेशी चलन वाढवण्यासाठी ही आयती संधी असल्याचे बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने म्हटले आहे.
अमेरिकेत 15 दिवसांपर्यंत शटडाउन राहिल्यास फेडरल रिझव्र्हची रोखे खरेदी बंद करण्याची योजना जानेवारीमध्ये पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. यामुळे रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी परदेशी चलनसाठा वाढवण्यासाठी अधिक वेळ मिळणार असल्याचे बँकेच्या अहवालात म्हटले आहे. चलनसाठा वाढवण्यासाठी आरबीआयकडून या संधीचा निश्चितच फायदा घेतला जाईल, अशी अपेक्षा असल्याचेही यात म्हटले आहे. सात महिन्यांच्या आयातीसाठी पुरेल एवढाच परदेशी चलनसाठा शिल्लक असल्याच्या पार्श्वभूमीवर याची नोंद घेणे आवश्यक आहे. गेल्या 1998मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
दोन आठवडयांपासून अमेरिकेतील शटडाउनचा देशाच्या विकासावर फारसा परिणाम होणार नसल्याचे सांगताना चालू वर्षातील 4.6 टक्के विकासदराचा अंदाज कायम ठेवण्यात आला असल्याचेही या अहवालात स्पष्ट केले आहे. दरम्यान, रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयने रोखता कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजना डिसेंबपर्यंत काढून घेतल्या जातील, असेही या बँकेने म्हटले आहे.