मुन्नार

भारताला स्वातंत्र्य मिळाले १९४७ साली. त्यानंतर १९५६ साली केरळ हे राज्य उदयाला आले. हे राज्य कोची, मलबार आणि त्रावणकोर अशी तीन छोटी संस्थाने एकत्र करून स्थापण्यात आले. केरळ म्हटल्यावर जसे समुद्र किनारे आठवतात, तसेच आठवते घनदाट जंगले आणि अभयारण्ये. चहाचे मळे, कथकली नृत्य, असंख्य नारळाची झाडे, आणि हिरवागार निसर्गही.
Munnar

(फोटो सौजन्य – AirTheWorld)
टेक्काडी येथे आहे भारतातील सर्वात मोठे अभयारण्य. ७७७ किमीच्या या अभयारण्यात आहे सुमारे २५ किमीचे कृत्रिम सरोवर. शांत एकांतात असलेल्या या अभयारण्यात व्याघ्र प्रकल्प राबविला गेला आहे. तसेच येथील निसर्गसंपदा, ओळखी अनोळखी वृक्ष, विविध जातीची फुले, पक्षिगण, आणि आदिवासी परंपरा जपणारी खेडी मनाला मोहून टाकतात. पेरियार नदीवर धरण बांधले गेले आहे. परियार अभयारण्यात जाण्यासाठी चांगला सीझन म्हणजे मार्च ,एप्रिल मे महिन्याचा. ट्रेकिंगची आवड असणार्‍याना ट्रेकिगचा अनुभव येथे घेता येतो तसेच हत्ती राईड, बोटिंग, प्लँटेशन टूरही करता येते. बोटीने जाताना कांही वेळा आजूबाजूच्या परिसरात वावरत असलेले वाघ, हत्ती, हरणे, माकडे, चित्ते आपले नशीब जोरावर असेल तर दर्शन देतात.
Munnar
प्लँटेशन पाहायचे म्हणजे पाहायच्या मसाल्याच्या बागा. येथे वेलदोडे, मिरी, जायफळ ,लवंगा यांची लागवड केलेली असून डोंगरउतारावरच्या या बागा पाहताना गाईड हवाच. नाही तर कोणते झाड कशाचे हे कळणार कसे? चहा कॉफीचे मळे डोळ्यांना सुखद गारवा देणारे. आदिवासी वस्त्यांतून फेरफटका मारायचा. या अभयारण्यात सुमारे २६५ जातींचे पक्षी आहेत असे सांगतात. अर्थात अभयारण्याची सफर चांगला गाईड असेल तरच आनंददायी होते हे नक्की.
Munnar1
मुन्नार हे केरळातील हिल स्टेशनचे गांव प्रसिद्ध आहे ते डोंगर उतारावरच्या चहाच्या मळ्यांसाठी. समुद्रसपाटीपासून ६ हजार फूट उंचीवरचे हे छोटेसे गांव ही मुळची ब्रिटीश वसाहत. उंच डोंगर, खोल दर्‍या, थंडगार हवा, अनेक जातींची फुले, लेवून नटलेले हे गांव मनाला शांत करते आणि एका ट्रान्समध्ये नेते. दक्षिणेकडील सर्वात उंच शिखर अनामुंडी येथेच आहे. ट्रेकर्सची पुरेपूर हौस भागविणारे डोंगर येथे आहेत. तसेच दर बारा वर्षांनी फुलणारी निळी नीलकुरुंजी नावाची फुले डोंगररांगांचे उतार निळे करून टाकतात. ऐन पावसाळ्यात गेलात तर धुके, अनेक झरे, छोटे मोठे धबधबे पाहायला मिळतात. हॉटेल्सची उत्तम व्यवस्था आहे आणि येथे आजकाल पर्यटकांची गर्दीही खूप असते. बोटिंग करण्यासाठी सुंदर सरोवरे, पॅराग्लायडिंगची सुविधा, बलून राईड, कॅम्पिंग, वन्य जीव सफारी अशी अनेक करमणुकीची आणि साहसाची हौस भागविणारी स्थाने येथे आहेत. एको पॉईंटही भेट देण्यासारखा.
Munnar2
केरळच्या सर्व भागात असलेली सर्वान्ना चेन मुन्नारमध्येही आहे.  सर्वान्ना दिसायला खानावळींसारखे असले तरी येथे अतिशय उत्तम दाक्षिणात्य पदार्थ मिळतात. डोसे, इडली, उत्तप्पा , अप्पे, अप्पम याबरोबरच खास दक्षिणी जेवणाचा स्वाद येथे मनमुराद लुटता येतो. या खानावळीजवळच असलेल्या छोट्या दुकानातून उत्तम प्रकारचे घरी बनविलेले चॉकलेटही मिळते.