इस्लामाबाद – पाकिस्तानचे भूतपूर्व लष्करी कायदा प्रशासक जनरल परवेज मुशर्रफ यांच्या विरुद्ध कुप्रसिद्ध लाल मस्जिद मोहिमेच्या संदर्भात नवा खटला दाखल करण्यात आला आहे. या मस्जिदीमधून अतिरेकी कारवायांना बळ दिले जाते या संंंशयावरून मुशर्रफ यांनी अध्यक्ष असताना लष्करी कारवाई केली होती. या कारवाईत या मस्जिदीतील धर्मगुरु अब्दुल रशीद यांचा आणि त्यांच्या आईची हत्या झाली होती. या दोघांच्या हत्येला जबाबदार धरून हा खटला दाखल करण्यात आला आहे.
अशा प्रकारचा खटला दाखल करावा अशी मागणी मारले गेलेले धर्मगुरु अब्दुल रशीद यांचे चिरंजीव हारून रशीद यांनी केली होती. इस्लामाबादच्या उच्च न्यायालयात या संदर्भात त्यांनी खाजगी याचिका दाखल केली होती आणि तिच्यावरून उच्च न्यायालयाने या प्रकरणात खटला दाखल करण्यात यावा असा आदेश दिला होता. परंतु पोलीस अधिकारी बरेच दिवस हा आदेश पाळत नव्हते. आता मात्र उच्च न्यायालयानेच या गोष्टीची दखल घेतली आणि खटला दाखल होत नसेल तर तो दाखल न करणार्या पोलीस अधिकार्यांवर न्यायालयाच्या अवमानाचा खटला दाखल केला जाईल, असा इशारा दिला.
या इशार्यामुळे शेवटी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. असे असले तरी मुशर्रफ यांचे समर्थक या खटल्याच्या विरोधात आहेत. या दोघांचा झालेला हा खून म्हणजे वैयक्तिक कारणातून केलेला खून नाही तर अतिरेकीविरोधी कारवाईचा एक भाग म्हणून ते मारले गेलेले आहेत. या कारवाईत जवानांसह ५८ जण मारले गेलेले आहेत. अशा स्थितीत केवळ दोघांच्याच हत्येला केवळ मुशर्रफ यांना जबाबदार धरणे हे सयुक्तिक ठरणार नाही, असे मुशर्रफ समर्थकांचे म्हणणे आहे. या युक्तिवादाच्या आधारे आपण मुशर्रफ यांचा बचाव करू, असे या समर्थकांनी जाहीर केले आहे. यापूर्वी मुशर्रफ यांच्यावर दोन खटले दाखल आहेत. त्यातला एक खटला बेनजीर भुट्टो यांच्या हत्येचा आहे तर दुसरा बलुचिस्तानातील आदिवासी नेते अकबर बुगटी यांच्या हत्येचा आहे.