इजिप्तमध्ये २५ वर्षांनंतर झळकतोय ‘चेन्नई एक्स्प्रेस`

कैरो- इजिप्तमधील राजकीय संघर्षामुळे हिंदी सिनेमांसाठी येथील दारे सुमारे २५ वर्षांपासून बंद झाली होती. मात्र, आता बॉलिवूडमुळे देशातील सिने उद्योगाला चांगली चालना मिळेल, असा विश्वास येथील वितरकांनी व्यक्त केला आहे. इजिप्तमधील भारतीय सिनेमाचा २५ वर्षांचा दुष्काळ संपला आहे. शाहरुख खानचा ‘चेन्नई एक्स्प्रेस` हा सिनेमा गुरूवारी कैरो आणि अलेक्झांड्रिया येथील सिनेमागृहांत अरेबिक सबटायटल्ससह झळकला.

कैरोमधील भारतीय दूतावास, युनायटेड मोशन पिक्चर्स आणि गौरांग फिल्मसने या सिनेमाच्या प्रदर्शनाबद्दल आनंद व्यक्त केला. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा सिनेमा कैरोमधील आठ आणि अलेक्झांड्रियामधील दोन सिनेमागृहांत दाखविला जात आहे.

या सिनेमानंतर आता आगामी काळात हृतिक रोशनचा ‘क्रिश ३’ आणि अमिर खानचा ‘धूम ३` या सिनेमाच्या प्रदर्शनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २००९ मध्ये शाहरुख खानचा ‘माय नेम इज खान` वगळता गेल्या २५ वर्षांत इजिप्तमध्ये बॉलिवूडचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ प्रदर्शित झाल्यामुळे आता केवळ इजिप्तचे बॉलिवूडशी नाते निर्माण होणार नसून, या उद्योगालाही मोठी चालना मिळेल.

Leave a Comment