मुंबई: गुजरातचे मुख्यामंत्री तथा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली. फॅसिस्ट विचारांच्या नागरिकांनी देशाला कायम काही शतके मागे नेले आहे. आता अशा विचारांचे लोक गेल्या काही दिवसांपासून सत्ता काबीज करण्याची स्वप्ने पहात आहेत. मात्र, देशातील जनता सूज्ञ असून ती अशा प्रवृत्तींना स्वीकारणार नाही, हे आगामी निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल, असे मुख्यामंत्री चव्हाण यावेळी म्हणाले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या गांधीजींची हत्या करणा-या फॅसिस्ट प्रवृत्तींनीच केल्याच्याय आरोपाचा पुनरुच्चार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. गांधी जयंतीनिमित्त सेवा दलातर्फे मुंबईत झालेल्या कार्यक्रमात चव्हाण यांनी गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावरही हल्ला चढवला.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘सध्या याच फॅसिस्ट प्रवृत्ती सत्ता मिळवण्याचे स्वप्न पहात आहेत. गांधीजींचे अहिंसक विचार व आवाज दाबण्यासाठी अशाच विचारांच्या प्रवृत्तींनी त्यांची हत्या घडवून आणली. डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्याही अशाच प्रवृत्तींनी घडवून आणली. दाभोलकरांची हत्या अत्यंत सुनियोजित पद्धतीने घडवून आणली आहे. या हत्येचा तपास पोलीस करत असून त्यांना त्यांचे काम करू दिले पाहिजे.’