बीड – बीडमधील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी बीड जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांविरोधात अखेर गुन्हे दाखल झाले आहेत. खासदार रजनी पाटील, बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांचा यामध्ये समावेश आहे.
या सर्वपक्षीय नेत्यांविरोधात सगळ्यांवर स्वतःच्या ताब्यात असणा-या संस्थांसाठी मध्यवर्ती बँकेतून बेकायदेशीर कर्ज घेतल्याचा आरोप आहे. या संस्थांकडे कोट्यवधींचे कर्ज थकित असताना नव्याने कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांच्यासह २४ संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
२००८ मध्ये ‘आदित्य’ बहुउद्देशीय संस्था बीड, श्रीमती मल्लवाबाई वल्याळ डेंटल कॉलेज सोलापूर, व्यंकटेश्वर अँग्रो प्रोडक्ट्स, जय भवानी सहकारी साखर कारखाना, खंड औद्योगीक बहुउद्देशीय संस्था आणि गजानन सहकारी साखर कारखाना या सर्व संस्थेला मिळून बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेतून ३५ कोटी ३८ लाख रुपयांचे कर्ज तत्कालीन संचालकांनी मंजूर केले होते. मात्र, हे कर्जमुदतीत बँकेत भरले गेले नाहीत.
बँकेच्या अधिका-यांनी सदर कर्जांच्या कागदपत्रांची खातरजमा केली असता हे सर्व कर्ज विनातारण आणि बोगस कागदपत्रांच्या आधारावर देण्यात आल्याचे उघड झाले होते. त्यामुळे बीडमधील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक शिवानंद टाकसाळे यांनी बीड पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार बीड जिल्ह़यातील सर्वपक्षीय मंडळीवर गुन्हा दाखल झाला आहे.