छोटा शकीलची सोनू निगमला धमकी

मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलने प्रसिद्ध गायक सोनू निगम याला धमकी दिल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी सोनूने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीशी असलेला करार मोडावा अन्यथा समाजात बदनामी करण्याची धमकी छोटा शकीलने फोनद्वारे दिली असल्यापचे समजते. या प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत.

दाऊद इब्राहीम गँगचा सदस्य छोटा शकील याच्याकडून त्याला धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत. या प्रकरणी सोनू निगमने मुंबई पोलिसांना माहिती दिली आहे. सोनू निगम सध्या परदेशात आहेत. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीशी असलेला करार रद्द करुन दुबईतल्या अल्ताफ नावाच्या व्यक्तीच्या कंपनीशीच करार करावा, अन्यथा रेकॉर्ड केलेले विशिष्ट फोन कॉल जाहीर करून बदनामी करू; अशा स्वरुपाची धमकी सोनू निगमला येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोनू निगम ऐकत नाही आणि फोन घेणे टाळत आहे. हे पाहून छोटा शकीलकडून धमकीचे मेसेज पाठवण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याआमुळे या प्रकरणी सोनू निगमने मुंबई पोलिसांना माहिती दिली आहे. या प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलिस करीत आहेत.