आपल्या प्रत्येक चित्रपटामध्ये वेगळ्य़ा प्रकारचे पात्र साकारण्यास प्राधान्य देण्यासाठी आणि अभिनयाला आव्हानाच्या रूपात स्वीकारण्यासाठी अभिनेत्री कंगणा राणावत ओळखली जाते. याच प्रतिमेला जागत कंगणा ‘कृष-३’ चित्रपटामध्ये आणखी एक आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहेच, पण मराठीतील ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या बहुचर्चित ‘रज्जो’ चित्रपटात ती आणखी वेगळेपण दाखविणार आहे. ‘रज्जो’मध्ये ती १७ वर्षांच्या एका तरुणासोबत इश्काचा खेळ खेळणार आहे.
‘रज्जो’ची कथा अतिशय विलक्षण असून त्यात कंगणा किशोरवयीन मुलासोबत प्रमुख भूमिकेत दिसेल. यात कंगणाने मुजरा करणार्या नर्तकीची भूमिका केली असून रज्जो हे तिचे नाव आहे. या चित्रपटाबाबत कंगणा प्रचंड उत्सुक आहे. कारण तो १५ नोव्हेंबर म्हणजे ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पिलर्स फिल्म्स बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटामध्ये कंगणासह पारस अरोरा, प्रकाश राज, महेश मांजरेकर आणि जया प्रदा यांच्या प्रमुख भूमिका असून साहित्य अकादमी राष्ट्रीय पुरस्कार व भारतीय भाषा परिषद पुरस्कार विजेते प्रख्यात साहित्यिक विश्वास पाटील यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. आपल्या स्वप्नातील निर्मिती असलेल्या या चित्रपटात थोडीही उणीव ठेवण्यास पाटील तयार नाही. ‘रज्जो’ची कथा हटके असली तरी बॉक्स ऑफिसवर त्याची संजय लीला भन्साळीच्या ‘रामलीला’सोबत चकमक उडणार आहे. त्यामुळे हा चित्रपट किती गर्दी खेचू शकतो, हे आत्ताच सांगणे अवघड आहे. कारण दीपिका पदुकोन व रणवीर सिंह यांची जोडी असलेल्या ‘रामलीला’च्या प्रमोशनसाठी जोरात तयारी केली जात असून प्रेक्षकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.