अहमदनगर- दोन चुलत भावांनी अल्पवयीन बहिणीला चाकूचा धाक दाखवून सातत्याने बलात्कार केल्याने ती गर्भवती झाली. चाईल्ड लाईनच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस येऊन दोन्ही भावांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना पारनेर तालुक्यात घडली.
नगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या परिसरात दोन दिवसांपूर्वी १५ वर्षे वयाची एक मुलगी सापडल्याची माहिती पोलिसांनी चाईल्ड लाईनला दिली. चाईल्ड लाईनच्या कार्यकर्त्यांनी बारकाईने चौकशी केली असता ती मुलगी पारनेर तालुक्यातील धोतरे येथील असल्याचे तसेच ती ५-६ महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. त्यामुळे कोतवाली पोलिसांनी पारनेरहून या पीडित मुलीच्या वडिलांना नगरला बोलावून घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तिच्या चुलत भावांनी तिला चाकूचा धाक दाखवून गेल्या ८-९ महिन्यांपासून सातत्याने बलात्कार केला. त्यातूनच ही मुलगी गर्भवती असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी तातडीने पारनेर पोलिसांशी संपर्क साधून त्यांना कारवाईबाबत माहिती दिली. पारनेरच्या साहाय्यक पोलिस निरीक्षकांनी चाईल्ड लाईनच्या महिला कार्यकर्त्यां व महिला पोलिसांच्या मदतीने पीडित मुलीचा जबाब नोंद केला. त्या जबाबानुसार पारनेर पोलिसांनी दोन भावांला तातडीने अटक केली.