मुजफ्फरनगर : दंगल बळींच्या वारसांना नोकर्‍या

लखनौ – चालू महिन्यात उत्तर प्रदेशाच्या पश्‍चिम भागातील मुजफ्झरनगर आणि त्याच्या लगतच्या भागात झालेल्या जातीय दंगलीत बळी पडलेल्या लोकांच्या वारसांना सरकारी नोकरी दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री अखिलेशसिंग यादव यांनी केली असून राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला तशा सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारच्या अधिकृत प्रवक्त्याने ही माहिती दिली.

अशा प्रकारे या आपद्ग्रस्तांना नोकर्‍या देण्याचा निर्णय गेल्या १५ तारखेला घेण्यात आला होता. आता त्याची अंमलबजावणी केली जात आहे आणि तसा शासकीय आदेश आता जारी करण्यात आला आहे. या दंगलीत ६२ लोक मारले गेले आहेत. त्यापैकी ५ जणांची ओळख पटलेली नाही. उर्वरित ५६ जणांपैकी एका बळीचा वारस कमी वयाचा आहे. उर्वरित ५५ जणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकर्‍या दिल्या जातील, असे या प्रवक्त्याने सांगितले.

सहरानपूर विभागाच्या विभागीय आयुक्तांनी भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. ४७ जणांना चतुर्थश्रेणीच्या तर ८ जणांना तृतीय श्रेणीच्या नोकर्‍या दिल्या जाणार आहेत. या नोकर्‍या याच परिसरातील विविध शासकीय खात्यातल्या असतील.

Leave a Comment