मुंबई बलात्कारातील आरोपी सिराज रहमानचा पोलिसांना नाही ठावठिकाणा

मुंबई – मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरणातील एक आरोपी सिराज रहमान हा नेमका कुठे आहे असा सवाल मुंबई सत्र न्यायालयाने विचारला आहे. त्यावर तो नेमका कुठे आहे हे माहित नसल्याचे उत्तर ठाणे पोलिसांनी दिले आहे. महालक्ष्मी परिसरातील शक्ती मिलमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारात सिराज रहमान हा पाच आरोपी पैकी एक आहे.

सध्या तो न्यायलयीन कोठडीत आहे. पण त्याला कोणत्या जेलमध्ये ठेवलं आहे याचं उत्तर क्राईम ब्रान्च आणि ठाणे पोलिसांकडे नाही. त्याची न्यायालयीन कोठडी आज संपत असल्यामुळे त्याला आज कोर्टात सादर करणे अपेक्षित होते. पण तो कोर्टात हजर होऊ न शकल्याने सुनावणी उद्यापर्यंत लांबणीवर पडली आहे.

कोर्टात आज याबाबत विचारणा झाली असता सिराज कोणत्या जेलमध्ये आहे, याची माहिती नसल्याचं क्राईम ब्रान्च आणि ठाणे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आज जेलच्या अधिकार्‍यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सिराज ठाणे जेलमध्येच असून गार्डच्या कमतरतेममुळे त्याला आज कोर्टात हजर करता आलं नाही, असे तुरूंग अधिकार्‍यांनी सांगितले.