मुंबईत इमारत कोसळल्याने चार जण ठार

मुंबई – डॉकयार्ड स्टेशनजवळील पाच मजली इमारत कोसळल्याने चार जण ठार झाले असून १५ नागरिक जखमी झाले आहेत. या इमारतीखाली अजून ६० ते ८० नागरिक ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास ही इमारत कोसळली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल झाल्या असून ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

इमारती खाली अडकलेल्या नागरिकांची संख्या अधिक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. बीएमसी कर्मचायांसाठी बांधण्यात आलेल्या या इमारतीत एकूण २६ घरे असून त्यात २२ कुटुंबे वास्तव्य करत होती. इमारत ६० वर्ष जूनी असून इमारतीला धोकादायक इमारत म्हणून महापालिकेने घोषीत केले होते. यानंतर काही रहिवाशांनी अंतर्गत डागडूजीदेखील करुन घेतली होती. शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास इमारत पत्त्याप्रमाणे कोसळली.

ढिगा-याखाली सुमारे ६० ते ७० रहिवासी अडकल्याचे सांगितले जाते. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्यांसह वैद्यकीय पथक व मुंबई पोलीस तसेच नौदलाचे वैद्यकीय पथक आणि नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटची टीम दाखल झाली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून १५ जखमींवर जे. जे. रुग्णालयात वॉर्ड नंबर १९मध्ये दाखल करण्यात आले आहेत.
सहा तासानंतर झाली सुखरुप सुटका
ढिगारा उपसण्याचे कार्य वेगाने सुरु असून बचावपथकाला सहा तासांनतर पाच जणांना सुखरुप ढिगा-याखालून काढण्यात यश आले.