उ. प्र. मध्ये मोदींच्या सभांना बंदी घालणार?

लखनौ – भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या जागा वाढविण्यासाठी उत्तर प्रदेशावर भर देण्याचे ठरवले आहे आणि उत्तर प्रदेशातून अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी तिथे हिंदुत्ववादी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु भाजपाच्या आणि नरेंद्र मोदी यांच्या या योजनेला सुरुंग लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री अखिलेशसिंग यादव यांनी घेतला असून त्यांचे सरकार जातीय तणाव वाढण्याचे कारण समोर करून मोदी यांच्या सभांना परवानगी नाकारणार असल्याचे वृत्त आहे.

नरेंद्र मोदी यांनी कानपूर येथे १५ ऑक्टोबर, झाशी येथे २५ ऑक्टोबर आणि बहिराईच येथे ४ नोव्हेंबरला सभा आयोजित केलेले आहेत. परंतु या सभांना परवानगी देऊ नये, असा सल्ला राज्य सरकारच्या ज्येष्ठ अधिकार्‍यांनी अखिलेश यादव यांना दिला आहे. अर्थात मोदी यांच्या सभांची अनुमती नाकारण्यास न्यायालयाची अनुमती मिळेल की नाही यावर विचार सुरू आहे. कारण अनुमती नाकारल्यास भाजपाचे कार्यकर्ते न्यायालयात जाऊ शकतात आणि तिथे सरकार आपले म्हणणे सिद्ध न करू शकल्यास न्यायालयाकडून परवानगी दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत सरकारची फजिती होण्याची संभावना आहे. तिचा विचार आता सुरू झाला आहे.

मोदी यांच्या सभांच्या जाहीर झालेल्या या तारखा त्या त्या भागातल्या धार्मिक उत्सवाच्या काळातल्याच आहेत. त्यामुळे तिथे सभांमुळे गोंधळ उडण्याची शक्यता आहे, असे कारण समोर करून सरकार त्यांच्या सभांची परवानगी नाकारू शकते असे सरकारी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment