दाभोळकर हत्त्येतील संशयितास अटक

सोलापूर – डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्त्येमागचे आरोपी पकडण्यात अपयश आले असल्याचे म्हटले जात असले तरी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील महुद येथे या संबंधात एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. गेल्या सोमवारी ही अटक झाली, मात्र त्याची बातमी गुप्त ठेवण्यात आली आहे. त्याला अधिक चौकशीसाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या तरुणाचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. महुद येथील हा तरुण नेमका कोण आहे आणि तो कोणत्या संघटनेचे काम करत होता याचाही पत्ता पत्रकारांना लागलेला नाही. सांगोला पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला. परंतु त्यांनीही या तरुणाचे नाव सांगितले नाही.

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या जात असताना काही लोकांनी प्रत्यक्षपणे पाहिले आहे आणि त्यांनी केलेल्या वर्णनाबरहुकूम संशयित आरोपींची रेखाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. महुद येथून अटक करून नेण्यात आलेल्या तरुणाची चेहरेपट्टी या रेखाचित्रातल्या तरुणाच्या चेहर्‍याशी मिळतीजुळती असल्याचे समजले आहे. सांगोला पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या गोष्टीला मात्र दुजोरा दिला आहे.