आकडे पंचमी

आपल्या संस्कृतीत नागपंचमी आणि रंगपंचमी या दोन पंचम्या लोकप्रिय आहेत. त्यातल्या एका पंंचमीला झोके खेळतात तर दुसर्‍या पंचमीला एकमेकांच्या अंगावर रंंग टाकतात. आता केन्द्रात आकडे पंचमी जारी आहे. भाजपा आणि कॉंग्रेसचे नेते एकमेकांवर रंगाच्या ऐवजी आकडे टाकून एक नवी आकडे पंचमी साजरी करीत आहेत. आजवर ते परस्परांवर शब्दांनी हल्ले करीत आले आहेत. पण आता त्यांनी ही लढाई अधिक सूक्ष्म केली असून परस्परांना केवळ आकडे फेकून मारायला सुरूवात केली आहे. खरे तर ही लढाई आणि फेकाफेकी अधिक सूक्ष्मपणे समजावून सांगायची तर असे म्हणता येईल की ते आता विकास वेगाचे आकडे परस्परांवर फेकायला लागले आहेत. नरेन्द्र मोदी यांनी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था आठ टक्क्यांनी वाढली असल्याचा दावा केला. सध्या कॉंग्रेसचे नेते दिग्विजयसिंग यांनी मोदींचा उल्लेख फेकू असा करायला सुरूवात केली आहे. ते काहीही फेकत असतात म्हणजे थापा मारत असतात असे त्यांना म्हणायचे असते. तेव्हा हा विकास वेगाचा आकडाही फेकलेलाच आहे असे त्यांचे मत. अर्थात आकड्यांची फेकाफेक सुरू झाली की, दिग्विजयसिंग यांनी बाजूला सरकले पाहिजे आणि तिथे आता चिदंबरम यांना पुढे केले पाहिजे कारण आकडे हा चिदंबरम यांचा खास प्रांत आहे.

म्हणून मोदी यांनी आकडे फेकायला सुरूवात करताच चिदंबरम आपल्या चोपड्या घेऊन पुढे सरसावले. चिदंबरम यांना आकड्यांचा फार नाद आहेच. कारण त्यांनी गेली दहा वर्षे नाना प्रकारचे आकडे फेकूनच जनतेला वेडे केले आहे. अशा प्रसंगी मोदी यांच्यासारखा अर्थतज्ञ नसलेला नेता आकडे फेकायला लागला तर ते ‘ मेरे आँगने मे तुम्हारा क्या काम है ’ म्हणून त्वेषाने मैदानात उतरले नसते तरच नवल. त्यांनी मोदींचा दावा खोडून काढताना वाजपेयी यांच्या काळात विकास वेग केवळ सहा टक्के होता असा टोला मारला. आपल्या युपीए आघाडीच्या पहिल्या पाच वर्षात तर आठ टक्के विकास वेग होता आणि तो भारताचा सुवर्णकाळ होता अशी सुपर फेकुगिरी केली. मोदी यांना एन्काउंटर फेम ठरवण्याचा सूप्त हेतू साधण्यासाठी त्यांनी मोदी यांच्यावर सुवर्णयुगाचे अस्त्र फेकताना, मोदी यांनी अशी आकड्यांची एन्काउंटरगिरी असे त्यांना बजावले. मोदी कशातही मागे पडणारे नव्हत पण चिदंबरम बरोबर आकड्यांंची मारामारी करताना त्यांना दम लागायला लागला. म्हणून ते मागे सरले आणि वाजपेयी यांच्या काळात आठ टक्के गाठून देणारे अर्थमंत्री यशवंत सिन्हा हे चिदंबरम यांना भिडले. त्यांनी आपल्या भात्यातली काही खास अस्त्रे फेकली आणि चिदंबरम यांना घायाळ केले.

संपुआघाडी सरकारातल्या नेत्यांचा जीव नेहमी प्रश्‍नांत अडकलेला असतो. त्यामुळे त्यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला की ते घायाळ होतात हे भाजपा नेत्यांना चांगलेच माहीत आहे. युपीए १ हा सुवर्ण काळ होता म्हणजे युपीए २ हा त्यापेक्षा वाईट काळ असणारच ना ? मग हा दुसरा काळ एवढा खडतर का ? एवढ्या बढाया मारताय तर मग अर्थव्यवस्थेला आता घरघर का लागली ? रुपया एवढा का घसरला ? या प्रश्‍नांनी चिदंबरम केवळ घायाळच झाले असे नाही तर निरुत्तरही झाले. यातल्या प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर त्यांच्याजवळ आहे. विशेष म्हणजे या सगळ्या प्रश्‍नांचे एकच उत्तर आहे. पण ते उत्तर देता येत नाही. अवघड जागचं दुखणं आणि जावई डॉक्टर अशी स्थिती असल्याने हे सारे प्रश्‍न ऐकून त्यांना गप्प बसावं लागतंय. त्यांनी हे उत्तर फेकून यशवंत सिन्हासह मोदी यांनाही घायाळ केले असते पण काय करणार ? उत्तर देता येत नाही. यशवंत सिन्हा यांना माहीत आहे म्हणून त्यांनी एन्काऊंटरच्या आरोपाला उत्तर देताना चिदंबरम यांना आकड्यांचा दहशतवाद न पसरवण्याचा त्यांना सल्ला दिला. एवढा आरोप होऊनही चिदंबरम यांना चुप बसावे लागले. अर्थव्यवस्था का बिघडली याचे उत्तर ओठापर्यंत आले होते पण ते गिळायला लागले.

चिदंबरम यांनी हे उत्तर दिले नाही पण आपण ते समजून घ्यायला काही हरकत नाही. युपीए २ च्या काळात प्रणव मुखर्जी हे अर्थमंत्री होते हे या अध:पतनाचे खरे कारण आहे. पण आता हे फसलेले अर्थमंत्री देशाचे राष्ट्रपती होऊन बसले आहेत. तेव्हा त्यांच्या डोक्यावर खापर फोडता येत नाही. एकंदरीत चिदंबरम असोत की सिन्हा असोत यातल्या कोणाच्याही काळात अर्थव्यवस्थेच्या विकासाचे नुसते आकडे ऐकून, गिळून बसावे लागले. यातल्या कोणत्याही आकड्याने पोट भरत नाही. वाजपेयी यांच्या काळात हे आकडे फेकताना त्यांच्या सरकारने फिल गुडचे सोंग उभे केले. तर युपीएने म्हणजेच सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग यांनी आम आदमीचा जप सुरू केला. या दोन्ही गोष्टी फसलेल्या आणि तरीही जनतेच्या तोंडावर फेकलेल्या आकड्यांना झाकण्यासाठी त्यांना उघड्या पडल्या. भाजपावाले सार्‍या अपयशाचे श्रेय कॉंग्रेसला देतात पण त्यांनी नाही म्हटले तरीही सहा वर्षे राज्य केले आहे. मग आता दोघांनाही प्रश्‍न विचारता येतो की, तुम्ही एवढे शहाणे होतात तर या देशातल्या गरीब लोकांना फुकटात अन्न धान्य का द्यावे लागते ?

Leave a Comment