ही कसली एकात्मता परिषद?

राष्ट्रीय एकात्मता परिषदेची बैठक काल पार पडली पण तिने कोणती एकात्मता साधली याचा शोध घ्यावा लागेल एवढी ती निरर्थक होती. आपल्याला एक गोष्ट तरी नक्कीच माहीत आहे की या बैठकीतून एकात्मता नक्कीच साधली गेली नाही कारण या बैठकीला आलेले प्रत्येक पक्षाचे नेते आपापला पक्षीय अजंंेंडा घेऊन आले होते. चंद्राबाबू नायडू हे तर आपला अखंड आंध्राचा कार्यक्रम रेटण्यासाठी आले होते. बैठकीला नरेन्द्र मोदी हजर नव्हते. त्यांच्या प्रमाणे अन्यही काही मुख्यमंत्री अनुपस्थित होते. जयललिता, ममता बॅनर्जी, अशोक गहलोत हेही अनुपस्थित होते. तेही मुख्यमंत्रीच आहेत पण त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा झाली नाही. मोदी हजर नव्हते याची मात्र चर्चा झाली. तशी ती माध्यमांनी केली तर तो त्यांच्या अभिरुचीचा भाग आहे असे म्हणून आपण गप्प बसू शकतो. शेवटी त्यांना स्वातंत्र्य आहेच पण खुद्द गृहमंत्र्यांनी याचा उल्लेख केला. मोदी यांच्या सारख्या नेत्यांनी या बैठकीला हजर रहायला हवे होते असे ते म्हणाले. नाही तरी सुशीलकुमार शिंदे हे फार विचार करून बोलण्यासाठी प्रसिद्ध नाहीतच. त्यांनी मोदी यांच्या गैरहजेरीचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला. बैठकीला हजर राहणारे म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचें मोठे खंदे पुरस्कर्ते आणि गेरहजर राहणारे हे म्हणजे एकात्मतेचे मारेकरी हे मत अप्रत्यक्षपणे मांंडण्याचा त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला.

राष्ट्रीय एकात्मता हा काही पक्षीय राजकारणाचा विषय नाही पण गृहमंत्र्यांनी तो तसा केला. अन्य कोणा मंत्र्याने तसा तो केला असता तर त्याला आपण माफ केले असते पण देशातली एकात्मता कायम राखण्याची जबाबदारी असलेल्या गृहमंत्र्यांनीच असा अशोभनीय प्रयत्न करावा ही मोठी शोकांतिका आहे. मोदी यांच्या अनुपस्थितीचा राजकीय लाभ घेणार्‍या शिंदे यांची अशोक गहलोत यांच्या अनुपस्थितीचा प्रश्‍न आला तेव्हा बोलती बंद झाली. ही बैठक नेमकी कशासाठी बोलावली होती आणि तिने नेमके काय साध्य झाले याचा आढावा घेतला असता असे दिसून येईल की, ती राजकारणासाठी आयोजित केली होती आणि तिच्यातून आयोजकांनीच राजकारण साधण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. उत्तर प्रदेशात मुजिफ्फरनगर येथे झालेल्या दंगलींच्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचे सरकार आहे आणि त्याला झोडपण्याची ही एक चांगली संधी आहे म्हणून तिच्याच पार्श्‍वभूमीवर बैठक घेण्यात आली. तिच्यात समाजवादी पार्टीला सरळ सरळ आणि भारतीय जनता पार्टीला आडवळणाने लक्ष्य करण्यात आले.

देशात कोठेही हिंदू मुस्लिम दंगल झाली की भाजपाला झोडपण्याची संधी म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. कारण भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी तसा मोका साधला. जातीय दंगलीचे कोणी राजकीय भांडवल करू नये असे त्यांनी बजावले. असे भांडवल कोण करीत आहे याचा त्यांनी शब्दानेही उल्लेख केला नाही. पण अशा लोकांचा बंदोबस्त करावा असे आवाहन त्यांनी राज्य सरकारांना उद्देशून केले. तसा बंदोबस्त करायला काही हरकत नाही पण नेमका कोणाचा बंदोबस्त करायचा आहे याचा काही पत्ता नाही आणि ज्यांनी तो करायचा आहे ते मुख्यमंत्री बैठकीला हजर नाहीत मग हे बैठक फलदायी कशी होणार ? किंबहुना तो तशी फलदायी व्हावी यासाठी ती आयोजित केलेलीच नव्हती. तो तर राजकारणाचा एक भाग होता. देशात जातीय दंंगली होतात पण आपण काहीच करीत नाही असे कोणाला वाटू नये म्हणून पार पाडलेला ते एक उपचार होता. देशात खरेच दंगली होऊ नयेत असा एखादा नेमक्या स्वरूपाचा काही तोडगा या बैठकीत निघालेला नाही. निघू शकणार नाही कारण बैठकीच्या आयोजनाचा हेतू शुद्ध नाही. मुळात हेतूच शद्ध नसेल तर फलित कसे शुद्ध असणार ? कोणाला तरी नाव न घेता लक्ष्य करायचे आणि आपल्या अल्प संख्यकांच्या मतांंची बेगमी करायची हेच या बैठकीचे उद्दिष्ट होते. त्यातून तेच साध्य झाले.

खरे तर आपल्या देशातल्या जातीय दंगलींचा आपण फार खोलात जाऊन विचार करीत नाही. जातीय दंगल झाली की कोणाला तरी झोडपायचे एवढेच आपल्याला माहीत आहे. देशातल्या जातीय दंगलींना हिंदू आणि मुस्लिम यांच्यातला मानसिक दुरावा कारणीभूत आहे. हा दुरावा स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या कॉंग्रेस नेत्यांनी तयार केला आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर सर्वंना समान लेखायला हवे होते पण तेव्हाच्या शासकांनी मुस्लिम समाजाला या देशातला नागरी कायदा लागू होणार नाही असे जाहीर केले. सर्व नागरिक समान आहेत असे म्हणायचे आणि मतांसाठी मुस्लिमांना खुुष करण्याकरिता त्यांना वेगळा कायदा लागू करायचा या कॉंग्रेस पक्षाच्या दुटप्पीपणामुळे या देशातल्या मुस्लिम आणि हिंदूंमध्ये अंतराय निर्माण झाला आहे. राजीव गांधी यांनी १९९० साली शहाबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा तिला पोटगी देण्याचा निकाल काही धर्मगुरूंना खुष करण्यासाठी बदलला आणि त्यासाठी घटनेत दुरुस्ती केली. त्यांना मिळालेली ही वागणूक हिंदूंच्या मनात नाराजी निर्माण करणारी ठरली आहे. देशातल्या एकात्मतेला सुरूंग लावणारा हा कार्यक्रम फार धोक्याचा आहे.

Leave a Comment