मुख्यमंत्री चव्हाण विरुद्ध शरद पवार सामना रंगणार

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्ष सुरु आहे. ही लढाई आगामी काळात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मैदानातही रंगणार असे दिसत आहे. या निवडणूकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आमने-सामने उभे राहण्याची शक्यता आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्रतिनिधित्वासाठी माझगाव क्लबकडून मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्ज भरला आहे. याआधी विलासराव देशमुख या क्लबचे प्रतिनिधित्व करत होते. आता पृथ्वीराज चव्हाण माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आता एमसीएची निवडणूक लढवण्यासाठी पात्र ठरतील.

येत्या १८ ऑक्टोबरला एमसीएची निवडणूक होत आहे. त्यामुळे त्यादिशेनेच पृथ्वीराज चव्हाणांनी हे पाऊल टाकल्याचं दिसत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनीही एमसीएची निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. पवारांनी त्यासाठी आपला पत्ताही काही दिवसांपूर्वीच बारामतीऐवजी मुंबईचा करुन घेतला आहे. त्यामुळे आता एमसीएच्या अध्यक्षपदासाठी या दोघांमध्ये लढत होणार का यासाठी अजून थोडी वाट पहावी लागणार आहे.

Leave a Comment