अहमदाबाद – भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींच्या नावाची घोषणा केल्यानंतर त्यांच्या गुजराथ राज्यातील अल्पसंख्याक मोर्चाने मोदींना अनोखी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या म्हणजे १७ सप्टेंबरला मोदींचा वाढदिवस आहे. या दिवशी अल्पसंख्याक मोर्चाने १ लाख मुस्लीमांना भाजपचे प्राथमिक सदस्यत्व देण्याचे काम पूर्णत्वास नेण्याचे ठरविले आहे. पक्षाचे हे नवे सदस्य जिल्हा स्तरावर उदया एकत्र जमणार आहेत आणि मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत असे अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष सूफी मेहबूब अली यांनी सांगितले.
मोदींनी २०११ साली सुरू केलेल्या सद्भावना मिशनचा हा दुसरा टप्पा असल्याचे सांगून मेहबूब म्हणाले की गुजराथमध्ये मुस्लीम कित्येक वर्षे विकास यात्रेत सामील झालेले आहेत. गेल्या बारा वर्षात भाजपने मुस्लींमांच्या तुष्टीकरणाचा प्रयत्न केलेला नाही तसेच गेल्या तीनही निवडणुकात एकाही मुस्लीम उमेदवारास उमेदवारी दिलेली नाही याविषयी बोलताना मेहबूब म्हणाले की मोदींची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड झाली आहे व त्यानिमित्ताने त्यांना वाढदिवसाची ही भेट दिली जात आहे. मुस्लीम समाज भाजपवर नाराज आहे असे विधान करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.