वॉशिग्टन – मेमरी चीप अधिकाधिक जलद करण्यासाठी संशोधकांनी नवीन पर्यावरण पूरक मिश्र धातूचा शोध लावला असून अॅल्युमिनियमचे ५० अणु आणि अँटीमनीचे ५० अणू यांच्या संयुगातून हा धातू बनविला गेला आहे. मेमरी चीपमध्ये या धातूपासून बसविले जाणारे उपकरण १० नॅनोमीटरपेक्षाही लहान आकाराचे आहे मात्र त्यामुळे मेमरीची रेंज मात्र अधिक वाढणार आहे असा संशोधकांचा दावा आहे.
भविष्यातील डेटा स्टोरेज तंत्रज्ञान हे आजच्या फ्लॅश मेमरीकडून फेज चेंज मेमरीकडे जात आहे. त्यासाठी अशा मिश्र धातूची गरज होती असे संशोधक झिलीन झाऊ यांनी सांगितले. झाऊ हे शांघाय इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रो सिस्टिम अॅन्ड आय टी या चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्स च्या संस्थेत कार्यरत आहेत. ते म्हणाले की आत्तापर्यंत फेज चेंज मेमरीसाठी जमॅनियम, अँटीमनी व टेल्युरियम च्या संयुगातून धातू बनविला जात होता मात्र ही मिश्रणे बनविणे वेळखाऊ आणि किचकट आहे. त्यामुळे नवीन मटेरियलचा शोध घेतला गेला आहे. हे मटेरियल मल्टी लेव्हल स्टोरेजसाठी वापरण्यासही अतिशय उपयुक्त ठरले आहे. शिवाय यामुळे चीपचा आकारही कमी होणार आहेच मात्र चीपची स्टोरेज क्षमता मात्र वाढणार आहे.