कोची- सगळयांनी माझ्यावर भरवसा ठेवा. मी आगामी काळात स्वत:चे निर्दोषत्वू सिद्ध करीन, याचा मला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया केरळचा वेगवान गोलंदाज शांताकुमारन श्रीसंतने पत्रकारांशी बोलताना दिली. आयपीएल- सहामध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी आजीवन बंदीची शिक्षा नुकतीच बीसीआयने दिली आहे. ही शिक्षा जाहीर झाल्यानंतर श्रीसंतने आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे.
यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना श्रीसंत म्हणाला, ‘बीसीसीआय शिस्तपालन समितीचा निर्णय माझ्या कारकीर्दीसाठी सर्वात मोठा धक्का आहे. मी अडचणीतून बाहेर येईल आणि पुनरागमन करेन याचा मला विश्वास आहे. मी काहीच चूक केली नाही हे मी म्हणू शकतो. माझ्यासाठी एकच चांगली गोष्ट आहे. ती म्हतणजे मी सध्या तुरुंगात नसून घरी आहे.’
यापूर्वी शनिवारी श्रीसंतने ट्विटरवरही प्रतिक्रिया दिली होती. कृपया माझ्यावर भरवसा ठेवा. मी स्वत:ला निर्दोष सिद्ध करीन, याचा मला विश्वास आहे. देव माझी मदत करील यावर माझा भरवसा असल्याचे श्रीसंत म्हणाला होता.