भुवनेश्वर – ओरिसाच्या मलकणगिरी जिल्ह्यामध्ये सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत एका महिला नक्षलवाद्यासह १४ नक्षलवादी ठार झाले. स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि जिल्हा ग्राम बल ही असरकारी यंत्रणा यांच्याशी झालेल्या चकमकीमध्ये एका खेड्यात शनिवारी रात्री ही घटना घडली. ओरिसामध्ये सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेत आजवर एवढ्या मोठ्या संख्येने नक्षलवादी मारले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ओरिसात चकमकीत १४ नक्षलवादी ठार
गेल्या मे महिन्यामध्ये छत्तीसगड राज्यात नक्षलवाद्यांनी कॉंग्रेसच्या शांती यात्रेवर हल्ला करून कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसह अनेकांची हत्या केली होती. त्या प्रकारातील संशयित आरोपी ओरिया आणि छत्तीसगडच्या सीमेवरील एका खेड्यामध्ये आले असल्याची माहिती खबर्यांकडून पोलिसांना मिळाली. तेव्हा पोलिसांनी त्यांच्या लपण्याच्या ठिकाणावर छापा टाकला. त्यात एवढे नक्षलवादी मारले गेले.
हे नक्षलवादी छत्तीसगडमध्ये कारवाया करून ओरिसामध्ये पळून आले होते. आपल्या लपण्याच्या ठिकाणावर पोलिसांनी छापा टाकला असल्याचे त्यांना लक्षात आले. तेव्हा त्यांनी पोलिसांवर प्रतिहल्ला चढवला मात्र त्यात पोलिसांच्या बाजूने कसलीही प्राणहानी न होता. नक्षलवादी मात्र मोठ्या प्रमाणावर मारले गेले. या घटनेनंतर पोलिसांनी या लपण्याच्या ठिकाणावर शोध मोहीम चालवली तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारूगोळा सापडला.
