घायाळ दीपिका उगवतेय कॅटरिनावर सूड

एकापाठोपाठ एक ओळीने हिट चित्रपट देऊन यंदाची सर्वात सफल अभिनेत्री ठरलेल्या दीपिका पदुकोनने अपेक्षेप्रमाणे आपल्या मानधनाचा आकडा वाढवत आपली कट्टर प्रतिस्पर्धी कॅटरिना कैफशी बरोबरी केली आहे. दीपिकाने केवळ मानधनाच्या आकड्याच्या बाबतीतच कॅटरिनावर मात केली आहे असे नाही तर जाहिरातींच्या दुनियेतही दीपिका तिला चांगलीच टक्कर देत आहे.

हल्लीच एका साबणाच्या जाहिरातीसाठी दीपिकाने तब्बल सहा कोटी रुपये घेतले. दुसरीकडे याच साबणाच्या कंपनीचा ब्रँड चेहरा असलेल्या कॅटरिनासाठी फक्त चार कोटी रुपये मोजले होते. आतल्या गोटातील माहितीनुसार, प्रत्येक बाबतीत कॅटरिनाच्या पुढे जाण्यासाठी धडपडणारी दीपिका तिच्यावर मागचा हिशेब चुकता करत असल्याचे मानले जात आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका आणि रणबीर कपूर यांचे प्रेमप्रकरण सर्वांच्या चर्चेचा विषय बनले होते.

मात्र त्यांच्या प्रेमात कॅटरिनाने एंट्री घेतली आणि पाहता पाहता रणबीरला दीपिकापासून दूर घेऊन गेली. तेव्हापासून दीपिका कॅटरिनावर चिडलेली आहे. गेल्याच महिन्यात कॅटरिनाची स्पेनच्या समुद्रकिनार्‍यावर रणबीरसोबत बिकिनी घातलेल्या अवतारात छायाचित्रे प्रसिद्ध झाल्याने दीपिकाच्या जखमेवर आणखी मीठ चोळले गेले. या अपमानाचा बदला घेण्याची वाट पाहणार्‍या दीपिकाला आता तशी संधी उपलब्ध झाली असून त्याची ती पुरेपूर वापर करून घेत आहे. सुदैवाने दैवाचीही तिला साथ लाभत आहे. बॉक्स ऑफिसवरील यशामुळे चित्रपट व जाहिरातींसाठीही मागणी वाढली आहे. याचा लाभ घेत ती कॅटरिनाला जमेल तिथे धक्का देत आहे.

दीपिकाचा भाव वधारल्याने आधी कॅटरिनाकडे असलेली साबणाची एक जाहिरात स्वत:हून तिच्याकडे चालत आली. या जाहिरातीसाठी कॅटरिनापेक्षा जास्त मानधन मागूनही कंपनी त्यास राजी झाली आहे. कॅटरिनाच्या हातातून ही जाहिरात हिरावून घेतल्यानंतर आता बॉक्स ऑफिसवरही दीपिका कॅटरिनाला दणका देण्याच्या तयारीत आहे.

Leave a Comment