राजकारणाचे बदलते रंग

उत्तर प्रदेशाच्या राजकारणातली समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण निरनिराळ्या समाज घटकांची मते बदलत आहेत. विशेषत: मुस्लिम समाज समाजवादी पार्टीपासून दूर जाण्याची चिन्हे आहेत. हा मुजफ्फरनगर दंगलीचा परिणाम आहे. समाजवादी पार्टीचे नेते आझमखान यांनी आपल्याच पक्षापासून स्वत:ला दूर ठेवण्यास सुरूवात केली आहे. ही दंगल एरवी होणार्‍या दंगलींसारखी नाही. तिच्याकडे फार वेगळ्या दृष्टीने आणि मुळात जाऊन पहावे लागेल. एका मुलीची छेड काढण्यावरून आणि नंतर झालेल्या हत्यांच्या साखळीतून ती वाढली आहे. भारतात सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्याबाबत गांभीर्याने विचार करणारांना या गोष्टीची दखल घ्यावी लागणार आहे आणि वस्तुस्थितीचा आधार घेऊन तिचे विश्‍लेषण करावे लागेल. समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव यांना या दंगलीने मोठा हादरा बसला आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी हा पक्ष मुस्लिमांच्या मतांवर निवडून येत असतो. मुलायमसिंग यांनी कल्याणसिंग यांच्या गळ्यात गळा घातला तेव्हा बाबरी मशिदीचा विध्वंस करणार्‍या या नेत्याला जवळ केले म्हणून मुस्लिम मतदारांनी मुलायमसिंग यांंना चांगलाच धडा शिकवला होता. मात्र या समाजाने त्यांना जवळ केले तेव्हा त्यांना विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाले.

हा समाज त्यांच्या मागे उभा राहतो कारण त्यांचा गेल्या काही वर्षातला अनुभव असा आहे की, मुलायमसिंग मुख्यमंत्री असतात तेव्हा राज्यातला मुस्लिम समाज सुरक्षित असतो. याच कारणाने हा समाज त्यांच्या मागे उभा रहात असतो. पण आता त्यांचे चिरंजीव अखिलेशसिंग हे मुख्यमंत्री असताना राज्यातले मुस्लिम असुरक्षित झाले आहेत. हा अनुभव केवळ मुजफ्फरनगरच्या बाबतीतच आला आहे असे नाही तर राज्यात अखिलेश मुख्यमंत्री झाल्या पासून निदान ५० वेळा आला आहे. आता मुलायमसिंग यांनी ही दंगल खरे तर धार्मिक दंगल नाही तर तो दोन जातीतला हिंसाचार आहे अशी सारवासारव सुरू केली आहे. त्यांच्या म्हणण्यात अजिबातच तथ्य नाही असे नाही पण वस्तुस्थिती काहीही असली तरीही हा समाज आता त्यांच्यापासून दूर चालला आहे आणि येत्या लोकसभा निवडणुकीत त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार असे दिसायला लागले आहे. मुजफ्फरनगरची दंगल हा उत्तर प्रदेशाच्या राजकारणात मैलाचा दगड ठरेल असे आताच काही निरीक्षकांनी सांगायला सुरूवात केली आहे. मुलीची छेड, तिचा बदल घेण्यासाठी खून आणि खुनाचा बदला घेण्यासाठी दोघांचे खून अशी ही खुनाची मालिका झाल्यावर हे प्रकरण जात पंचायतीत गेले आणि ठिणगीचे रूपांतर आगीत झाले.

महापंचायत भरवली गेली आणि तिला हजारो लोकांनी हजेरी लावली. मुलीच्या छेडाछेडीचा विषय किती संवेदनशील आहे याची कल्पना आता आपल्याला महाराष्ट्रात येत आहे. आधी छेडाछेडी केली जाते. कोणी तक्रार केली नाही की अशा लोकांना चेव चढतो आणि त्यातून अपहरण, बलात्कार अशा घटना घडतात. म्हणून आता सारा समाज छेडाछेडी बाबत सावध होत आहे. पण हा विषय जेवढा नाजुक आणि संवेदनशील आहे तेवढेच पोलीस या विषयाबाबत उदासीन आहेत. त्याचा परिणाम समाजात असा होत असतो. नेमके याच पंंचायतीत गायीची हत्या झाल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या आणि त्यामुळे लोक चिडले. अशा गोष्ट हाताळण्यात पोलीस कमी पडतात आणि पराचा कावळा होतो. उत्तर प्रदेशात एका छेडछाडीतून ४८ लोकांचे जीव गेले. तसेच २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले. समाजातल्या दोन वर्गात कायमचा अविश्‍वास निर्माण झाला तो निराळाच. या घटनांचे राजकीय परिणामही तेवढेच व्यापक होणार आहेत. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी सत्तेवर आली की गुंडाराज निर्माण होते असा मागचा अनुभव आहेच. त्याचा आता अनुभव येत आहे. अशा गुुंडांतूनच वाळू माफिया निर्माण होतात आणि ते सरकारलाही वाकवू शकतात हे आपण दुर्गाशक्ती नागपाल यांच्या निलंबनात पाहिले आहे.

अशा लोकांच्या हातात सत्ता गेल्यास राज्यात अराजक पसरायला काही वेळ लागत नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीला प्रचंंड बहुमत मिळाले असले तरीही आता मुस्लिम समाज त्यांच्या पासून दुरावले तर त्यांना येत्या लोकसभा निवडणुकीत मोठी हार पत्करावी लागेल असे लोकांना वाटत आहे. समाजवादी पार्टीने आता मुस्लिम आणि यादव या दोन जातींसोबत ब्राह्मण मतांनाही आपलेसे करायला सुरूवात केली आहे पण मुस्लिम समाज या पक्षापासून दूर जात आहे असे दिसायला लागताच ब्राह्मण समाजही त्यांच्या जवळ येणार नाही. एवढेच नाही तर या पक्षाचे मूळ भांडवल असलेला यादव समाजही त्यांच्यापासून दूर जाणार आहे. कारण शेवटी समाजवादी पार्टी हा केवळ उत्तर प्रदेशापुरता मर्यादित पक्ष आहे. लोकसभेच्या निवडणुकीत या पक्षाला यादव समाजाने मतदान केले नाही तरी त्याच्या राज्यातल्या सत्तेवर काही परिणाम होणार नाही. म्हणून हा समाज आता समाजवादी पार्टीपासून दूर राहणार आहे. समाजवादी पार्टीचा हा मतांचा आधार आपल्या जवळ यावा म्हणून बसपा नेत्या मायावती आणि भाजपाचेही नेते प्रयत्नशील आहेत. एकंदरीत या लोकसभा निवडणुकीत या राज्यात वेगळीच जातीय समीकरणे तयार होणार आहेत.

Leave a Comment