
पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी जागतिक तंबाखू विरोधी परिषदेच्या निमित्ताने दिलेल्या संदेशावर आपण सर्वांनी विचार करण्याची गरज आहे कारण भारतातल्या कर्करोगामुळे होणार्या मृत्यूच्या संख्येत ९० टक्के मृत्यू तंबाखू सेवनाने होत असतात. त्यात तरुणांचे प्रमाण मोठे असते. तंबाखूचा हा सामाजिक पैलू आहे पण त्यातच आर्थिक पैलूही गुंतलेला असतो. र्होडेशिया या देशात एडस्ने असेच मरणारांचे प्रमाण वाढले होते. त्यात तरुणांचा मोठा भरणा होता. त्याचा परिणाम असा झाला की त्या देशातला मुख्य व्यवसाय म्हणजे खनिजांचे उत्खनन हे ३० टक्के कमी झाले होते. आपल्या देशातल्या तंबाखूच्या व्यसनांचा असा आर्थिक पैलू तपासला गेलेला नाही पण तो तपासला तर आपल्या औद्योगिक आणि शेती उत्पादनावर त्याचा परिणाम झालेला नक्कीच दिसेल. सध्या आपण वारंवार भारताच्या लोकसंख्येचा संदर्भ देत असतो. भारतात जगातल्या अन्य देेशांच्या तुलनेत अधिक तरुण आहेत. हे तरुण आपल्या देशाचे भवितव्य ठरवीत असतात आणि ठरवणार आहेत. पण केवळ लोकसंख्या तरुण आहे म्हणून देशाचे भले होणार नाही. आहे ती तरुण लोकसंख्या समर्थ, निरोगी असायला हवी तरच देशाचे भवितव्य चांगले असेल. दुदैंवाने आपल्या देशातले तरुण मोठ्या संख्येने व्यसनी होत आहेत.
पंजाबातले ५५ टक्के तरुण व्यसनी आहेत अशी एक माहिती समोर आली होती. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पंजाबच्या दौर्यात पंजाब विद्यापीठात बोलताना या गोष्टीची चर्चा केली होती. आपल्या देेशाच्या लष्करात पंजाबातून मोठी भरती होत असते पण अशाच एका लष्कर भरती मेळाव्यात भरती करणार्या अधिकार्यांनी मोठी निराशा व्यक्त केली होती कारण भरतीसाठी आलेल्या तरुणांंत ९० टक्के मुले भरतीस पात्र नव्हती. त्यांची शरीरे जवान होण्यास योग्य नव्हती. हा व्यसनाचा परिणाम आहे. मध्यंतरी कोल्हापुरात एका संघटनेने मृतांची नोंद ठेवली असता असे आढळले की, दररोज सरासरी ८० लोक मरत आहेत आणि त्यातले ६० लोक व्यसनांमुळे आणि वयाची चाळिशी गाठण्याच्या आतच मरत आहेत. नाना प्रकारच्या व्यसनांच्या विरोधात काम करणारे कार्यकर्ते एक गोष्ट आवर्जुन सांगत असतात की, व्यसन करणारा एक माणूस केवळ स्वत:चेच नुकसान करून घेत असतो असे नाही तर तो आपल्या आसपासच्या २२ लोकांच्या जीवनावर कसला ना कसला विपरीत परिणाम करीत असतो.
आपल्या देशात दारूबंदी करण्यावर फार चर्चा होते. गुटखा अधुन मधुन बंद केला जातो. आता महाराष्ट्र शासनाने सुगंधी सुपारीही बंद केली आहे. या सगळ्या व्यसनांचे आपल्या जीवनावर आणि आरोग्यावर घातक परिणाम होत असतात. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घातली जाते. ती कधी उठवली जाते, कधी शिथील केली जाते तर कधी मर्यादित प्रमाणात जारी ठेवली जाते. दारूबंदीची घोषणा करताना दारूचे परिणाम सांगितले जातात. गुटखाबंदीचे परिणाम सांगताना गुटख्याने कर्करोग कसा होतो हे सांगितले जाते पण तंबाखूचे दुष्परिणाम काही कमी नाहीत मग ते जर माहीत आहेत तर तंबाखूवरच पूर्ण बंदी का घातली जात नाही ? असा प्रश्न विचारला जात असतो. या प्रश्नात काहीच चूक नाही. सरकारला किंवा अशा बंदीचे समर्थन करणार्या जाणकार लोकांना या गोष्टीची जाणीव नसते असे काही नाही. त्यांना तंबाखूमुळे मरणारांची संख्याही माहीत असते. पण तंबाखूवर बंदी घालायचा झाला तर ती बंदी किती परिणामकारक पणे राबवावी लागेल याचा विचार न केलेला बरा. देशात आज २० टक्के लोक कोणत्या ना कोणत्या प्रकाराने तंबाखूचा वापर करीत असतात. तंबाखू खाण्यावर बंदी घालून त्या बद्दल कोणाला अटक करायची झाली तर देशात किती लोकांना अटक करावी लागेल आणि त्यासाठी किती पोलीस लागतील याचा विचार करता अशी बंदी अशक्य आणि अव्यवहार्य असल्याचे दिसते. कारण आपल्या देशात तंबाखू खाण्याची परंपराच आहे.
अशा प्रकारची ही बंदी लादायची झाली तर आधी तंबाखूच्या लागवडीवरच बंदी घालावी लागेल. तीही अव्यवहार्य आहे पण निदान ती काही प्रमाणात लागू केली तरी तेवढाच का होईना मुळावर घाव घातल्यागत होणार आहे. तंबाखू मुक्तीचा हाच खरा मार्ग आहे. तो १०० टक्के परिणामकारक होणार नसेलही पण जेवढा होणार असेल तेवढा तो मुळापासून होणार आहे. अन्यथा इकडे सरकार तंबाखूवर बंदी घालते आहे आणि तिकडे तंबाखूची लागवड जोरात सुरू आहे अशाने काही तंबाखूबंदी होणार नाही. शेतकर्यांना तंबाखू लागवड करू नका असे सांगण्याचीही सोय नाही कारण अनेक शेतकर्यांचे ते निश्चित उत्पन्न देणारे पीक आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवरच्या निपाणी, कोल्हापूर या भागात तर तंबाखू हे अनेकांसाठी कॅश क्रॉप आहे. पण पंतप्रधानांनी तंबाखूची शेती बंद करण्यासाठी काही अनुदान देण्याचीही कल्पना बोलून दाखवली आहे. तंबाखूचा वापर कमी करणे तर आवश्यकच आहे पण त्यासाठी शक्य असतील ते मार्ग वापरले पाहिजेत. नसता आपले मोठे नुकसान होणार आहे. अनुदान देऊन, प्रबोधन करून किंवा कायदा करून अशा कोणत्याही मार्गाने हे करावे लागेल. या मार्गांनी काही प्रमाणात यश मिळू शकते. तसा अनुभव अमेरिकेत आला आहे.