
पुणे – अंधश्रद्धा विरोधी आंदोलनाचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला २० दिवसांचा कालावधी उलटूनही पुणे पोलिसांना गुन्हेगार पकडण्यात यश आलेले नाही. पोलिस अद्यापीही अंधारातच चाचपडत असताना पुणे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी नागरिकांना हत्येसंदर्भात माहिती असल्यास पत्र, मेलने कळविण्याच्या केलेल्या आवाहनाला मात्र भरघोस प्रतिसाद लाभला आहे. या प्रकरणात पोलिसांकडे १०० हून अधिक बेनामी पत्रे आली असून त्यातील तीन पत्रांत या हत्येमागे मंत्रतंत्र करणार्या् महिलेचा हात असू शकतो अशी शक्यता व्यक्त केली गेली आहे. या महिलेच्या कारवाया दाभोळकर यांनी उघड्या पाडल्या होत्या व या महिलेचे समर्थक असणारे अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचेही या पत्रात नमूद केले गेले आहे. या महिलेने अनेकवेळ दाभोळकरांना धमक्या दिल्या होत्या असेही समजते.
