लातूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार,

लातूर – दिल्लीतील गाजलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा आज निकाल लागलेला नाही तोपर्यंतच इकडे लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. यातील चार पैकी तीन आरोपी अल्पवयीन आहेत. अतनूर गावच्या शिवारात आठवीच्या वर्गात शिकणार्‍या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना 4 सप्टेंबर रोजी घडली.

या प्रकरणी पीडित मुलीने काल दिलेल्या फिर्यादीवरून चार आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे. पण यातील तीन आरोपी अल्पवयीन आहेत. गव्हाण येथील मुलगी अतनूर येथील शाळेत 8 वीच्या वर्गात शिक्षण घेते. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीही पीडित मुलीच्या वर्गात शिकणारेच आहेत. म्हणजे आठवीतील मुलांनीच हे अधम कृत्य केले आहे.

4 सप्टेंबरला सकाळी शाळेकडे जात असताना गव्हाण येथील आरोपी 19 वर्षाच्या ज्ञानोबा वजिरे याच्यासह अन्य तीन अल्पवयीन मुलांनी तिला जबरदस्तीने उचलून नेऊन भंग्याचा कालवा आणि करंजीच्या झाडीजवळ असलेल्या शेतात सर्वांनी बलात्कार केला. मुलीच्या तोंडात रूमाल कोंबून हात बांधून हा अत्याचार करण्यात आला. कुणाला सांगितल्यास तुला जाळून टाकू, अशी धमकीही या आरोपींनी दिली. तशी फिर्याद पीडित मुलीने जळकोट पोलीस ठाण्यात सोमवारी दिली. अत्याचाराच्या या घटनेने जळकोट तालुक्यात खळबळ उडाली आहे.