आसाराम बापूच्या इंदूर आश्रमाला नोटीस

इंदूर – वादग्रस्त आसाराम बापूच्या इंदूर येथील आश्रमाला जिल्हा प्रशासनाने जमिनीच्या भाडेपट्ट्याच्या संदर्भात नोटीस दिली आहे. आसारात बापूला याच आश्रमात गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली आहे. या आश्रमातल्या धार्मिक केन्द्राच्या संचालकाला ही नोटीस देण्यात आली आहे. आश्रमाने खांडवा रोड येथील आपल्या जागेवर बेकायदा बांधकाम केले आहे आणि जवळपासच्या सरकारी जमिनी हडप केल्या आहेत. यास्तव ही नोटीस बजावण्यात आली आहे.

कॉंग्रेसचे आताचे सरचिटणीस आणि १९९८ साली मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री असलेले नेते दिग्विजयसिंग यांनी आसाराम बापूंना सात हेक्टर जमीन वर्षाला एक रुपया भाड्याने दिली होती. ती देताना या जागेवर कायम स्वरूपी बांधकाम न करण्याची अट घालण्यात आली होती पण ती अट आसाराम यांनी मोडली असून या जमिनीवर इमारत बांधली आहे. म्हणून ही नोटीस बजावण्यात आली असल्याचे इंदूरचे जिल्हाधिकारी आकाश त्रिपाठी यांनी सांगितले.

आसाराम यांनी या जमिनीच्या नजिकची काही शेत जमीन खरेदी केली. ती खरेदी करण्याचा त्यांना अधिकार नाही. शिवाय ती जमीन गैरकृषी न करता तिच्यावर आसाराम यांचे दोन मजली घरही बांधले. या घरात पोहण्याचा तलावही आहे असे आकाश त्रिपाठी यांनी सांगितले. सरकारने दिलेल्या जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड केली जाईल असे ठरले होते पण आसाराम यांनी त्यावर शाळा काढली, वाहन तळ उभारला, खेळाचे मैदान तयार केले. या जमिनीवर ते शेतीही करीत होते.

या करारभंगाबद्दल खंडवा आणि देवास या दोन जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांनीही आसाराम बापू यांना अशाच नोटिसा दिल्या आहेत कारण त्यांना देण्यात आलेल्या जमिनी या दोन जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यकक्षेत येतात.