कराची सर्वात धोकादायक शहर

कराची- दर एक लाख व्यक्तींच्या मागे खून होण्याचे प्रमाण तब्बल 12.3, 2011मध्ये तब्बल एक हजार 723 खून तर 2012मध्ये तब्बल दोन हजार खून, ही माहिती आहे पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची शहरात होणा-या गुन्हेगारीची.

जगातील सर्वात धोकादायक शहर कराची असल्याची अशी माहिती पुढे आली आहे. गेल्या काही दशकांमध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. कराची शहराने पाकिस्तानची आर्थिक राजधानी असा मान मिळवला असला तरी जगातील अन्य शहरांपेक्षा या शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण 25 टक्क्यांहून अधिक असल्याचे एका परदेशी मासिकाने म्हटले आहे.

नोकरी आणि रोजगाराच्या संधी मिळत असल्यामुळे कराचीत येणा-या लोकांची संख्या वाढत चालली आहे. 2000 ते 2010 या काळात कराची शहराची लोकसंख्या 80 टक्क्यांनी वाढली. ही वाढ अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. तसेच याच काळात कराची शहरात दहशतवाद्यांनी अनेकदा हल्ले केले आहेत. यामध्ये बॉम्बस्फोट, आत्मघाती हल्ले, रॉकेट हल्ल्यांचा समावेश आहे. भर दिवसा खून, चोरी, मारामारी आणि लूटीमारीच्या घटना होतात असे या मासिकाने म्हटले आहे. तसेच गेल्या चार वर्षात शिया आणि सुन्नी या समुदारामध्ये मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या आहेत.