नरेन्द्र मोदी यांचा मार्ग खुला

नवी दिल्ली – गुजरातचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदी यांना लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्याबाबत रा. स्व. संघ आणि भाजपाच्या संयुक्त बैठकीत एकमत झाले असून येत्या १७ तारखेला त्यांच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या दोन दिवसांच्या बैठकीत मोदी यांच्या नावावर एकमत झाले असल्याचे वृत्त आहे. मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबरला आहे. तो मोका साधून त्यांच्या नावाची घोषणा करण्याचा विचार सुरू आहे.

भाजपाच्या काही नेत्यांचा मोदी यांच्या नावाला विरोध आहे. पण तरीही भाजपाच्या सांंसदीय मंडळाने समन्वय बैठकीत मोदी यांच्या नावावर सर्वसाधारण सहमती झाली असल्याचे सांगितले. त्यावर मोदी यांच्या नावाची घोषणा करायची की नाही हे संघाने भाजपाचे अध्यक्ष राजनाथसिंग यांच्यावर सोपवले. राजनाथसिंग हे तर मोदी यांच्या नावाला आधी पासूनच अनुकूल आहेत. एवढेच नाही तर ते मोदी यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे ज्या क्षणी ही जबाबदारी राजनाथसिंग यांच्यावर सोपवली गेली त्याच क्षण मोदी यांचे नाव जाहीर होणार हे स्पष्ट झाले.

मोदी यांच्या नावाला आता अडवाणी समर्थकांची सहमती मिळेल असा कयास आहे. पण ते काही अटींवर ही सहमती जाहीर करतील असे दिसते. मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करावे पण निदान आता होणार असलेल्या पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत ही घोषणा लांबणीवर टाकावी असे या गटाचे मत आहे. येत्या नोव्हेंबर मध्ये राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली आणि छत्तीसगड या राज्यांत निवडणुका होत आहेत. त्या भाजपासाठी जरूरी आहेत.

Leave a Comment